वार्ताहर/ टाळसुरे
दापोली तालुक्यामधील नारगोली येथे अचानक आग लागून सुमारे 670 काजूची झाडे जळून 6 बागायतदारांचे 2 लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी दुपारी 1.45 वाजता घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खबर देणारे विजय भदिरके (नारगोली-टाळसुरे) यांना रंजना चांदिवडे, अनुसया भडवळकर यांनी बागेमध्ये आग लागल्याची माहिती दिली. रंजना व अनुसया यांनी ग्रामस्थांच्या मदतीने लागलेली आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये काशीराम भदिरके यांच्या काजू बागेमधील 450 झाडे जळून सुमारे 1 लाख 87 हजार 500 रुपये, रामचंद्र जागडे यांच्या बागेतील 5 झाडे जळून 21 हजार रुपये, शांताराम भडवळकर यांच्या बागेमधील 15 झाडे जळून 6 हजार 250 रुपये, धोंडू सकपाळ यांच्या बागेमधील 70 झाडे जळून 25 हजार रुपये, सुरेश जागडे यांच्या बागेमधील 50 झाडे जळून 23000 रुपये, तर तुकाराम कुटरेकर यांच्या बागेमधील 80 झाडे जळून 32 हजार रुपयांचे नुकसान झाले.
अशाप्रकारे 6 बागायतदारांची सुमारे 670 काजूची लागती कलमे जळाल्यामुळे 2 लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण समजले नसले तरी ऐन काजूच्या मोसमामध्येच आग लागल्याने शेतकऱयांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक जळीत म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास दापोलीचे पोलीस नाईक नलावडे करीत आहेत.