संतप्त जमावाचा पॅलेस्टाइनच्या 4 गावांवर हल्ला ः घर-वाहनांना पेटविले
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
पॅलेस्टाइनी दहशतवाद्याकडून रविवारी इस्रायलच्या दोन नागरिकांची हत्या करण्यात आली होती. या हत्यांनंतर वेस्ट बँकेत हिंसा भडकली आहे. वेस्ट बँकेत राहणाऱया इस्रायली लोकांनी पॅलेस्टाइनच्या गावांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात एका पॅलेस्टिनी नागरिकाचा मृत्यू झाला आहे, तर 390 जण जखमी झाले आहेत. नबलस शहराच्या हुवारा, जतारा, बुरिन आणि असीर-अल-किब्लिया या गावांमध्ये हे हल्ले झाले आहेत.
या हिंसेनंतर पॅलेस्टिनी हल्लेखोरांनी एका इस्रायली-अमेरिकन व्यक्तीची गोळय़ा झाडून हत्या केली आहे. हल्लेखोरांनी इस्रायलच्या वाहनांवर तीनवेळा गोळीबार केला आणि मग वाहनांना पेटवून दिल्याचा दावा इस्रायलच्या सैन्याकडून करण्यात आला. तर अद्याप कुठल्याही पॅलेस्टिनी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. हा हल्ला इस्रायली लोकांच्या हिंसेला प्रत्युत्तरादाखल करण्यात आल्याचे हमास या दहशतवादी संघटनेने म्हटले आहे. हमासचे गाझापट्टीवर नियंत्रण आहे.

पॅलेस्टिनींना केले लक्ष्य
पॅलेस्टिनी गावांवर सोमवारी झालेल्या हल्ल्यात 30 हून अधिक घरांना आणि सुमारे 100 वाहनांना पेटवून देण्यात आले आहे. इस्रायली लोकांनी लोखंडी सळी आणि दगडांनी हल्ले केले आहेत. यादरम्यान इस्रायलच्या सैन्याने स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अश्रूधूराचा मारा केला. हल्ल्यानंतर 8 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती इस्रायलच्या अधिकाऱयांनी दिली होती. यातील 6 आरोपींची काही वेळानंतर सुटका करण्यात आली.
हिंसेविरोधात निदर्शने
इस्रायली लोकांकडून पॅलेस्टिनी गावांवर हल्ले करण्यात आल्यावर अनेक इस्रायली नागरिकांना विरोधात निदर्शने केली आहेत. या निदर्शकांनी बॅनर-पोस्टर झळकवून हिंसा संपवावी अशा घोषणा दिल्या आहेत.
अमेरिकेकडून हिंसेची निंदा
वेस्ट बँकेत पॅलेस्टिनींवर झालेल्या हल्ल्याची आम्ही निंदा करतो. इस्रायलचे सरकार हल्ल्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारून आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करेल. तसेच पॅलेस्टिनींना योग्य भरपाई देण्यात येईल अशी अशी अपेक्षा असल्याचे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
इस्रायल सरकार जबाबदार!
पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी या हिंसेसाटी इस्रायलच्या सरकारला जबाबदार धरले आहे. इस्रायलच्या सैन्याचे नियंत्रण असलेल्या भागात राहणाऱया लोकांनी ही हिंसा केल्याचा आरोप अब्बास यांनी केला आहे. दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी शांततेचे आवाहन केले आहे. लोकांनी शांत राहू इस्रायलच्या सैन्याला आरोपी पकडण्यास मदत करावी असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी पॅलेस्टिनी हल्लेखोरांनी ब्राचामध्ये राहणाऱया 2 इस्रायली युवकांची हत्या केली होती.









