अध्याय पंचविसावा
असं म्हणतात की, मनुष्य ज्या प्रकारचा आहार घेतो त्याप्रमाणे त्याचा स्वभाव बनतो. सात्त्विक आहार करणारा मनुष्य सत्वगुणी असतो तर राजस आहार करणारा रजोगुणी होतो. तामसी आहार करणाऱयात तमोगुणाची वाढ होते. त्याबद्दल बोलताना भगवंत म्हणाले, आरोग्यदायी, पवित्र आणि अनायासे मिळालेले भोजन सात्त्विक होय. जिभेला रूचकर वाटणारे अन्न राजस होय आणि दुःखदायी व अपवित्र आहार तामस जाणावा. अल्पाहार याचेच नाव पथ्य, आपल्या भुकेपेक्षा दोन घास कमीच खाणे हिताचे असते. पोटाचे चार भाग कल्पून दोन भाग अन्नासाठी, एक भाग पाण्यासाठी व उरलेला रिकामा ठेवल्यास अपचनाचा त्रास होत नाही. पवित्र म्हणजे धर्माने संपादन केलेले आणि तेही विशेष प्रयत्नाशिवाय मिळालेले असे अन्न असेल तर, तोच सात्त्विक आहार होय. यामध्ये फळे, कंदमुळे यांचा आवर्जून समावेश होतो. थोडक्मयात भूक तर भागावी पण जिभेचे फार लाड करू नयेत अशा पद्धतीच्या आहाराला सात्त्विक आहार म्हणतात. गोड, कुरकुरीत, खरपूस, झणझणीत असा आहार असेल तो राजसी आहार होय. राजसाला नानाप्रकारच्या पदार्थांची आवड असते. तामस मनुष्य जेवणात शिळे, खराब झालेले अन्न आवडीने खातो. अमंगळ आणि दुःखदायक असा आहार असेल तो तामसाचा म्हणून समजावा. निर्गुण मनुष्य प्रथम सत्वगुणी असतो. सात्त्विक असण्याची त्याला एव्हढी आवड असते की, तसं राहण्यासाठी त्याला काही वेगळे प्रयास करावे लागत नाहीत कारण ते त्याच्या अंगवळणी पडलेले असते. सत्वगुणानी परिपूर्ण झाल्याने तो भगवंताच्या चरणी समर्पित असतो. आपल्याला मिळालेले अन्न भगवंताचा प्रसाद म्हणून मिळाले आहे याची त्याला जाणीव असते. भगवंताच्या सहवासात तो कायम रहात असतो, त्यामुळे त्याच्या आहारात उच्छिष्ट प्रसाद, साधुसज्जनाचे उरलेले पवित्र अन्न, यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे भगवंतही त्याने उष्टे केलेले अन्न आवडीने खातात. शबरीच्या बोरांची गोष्ट आपल्या सर्वांना माहित आहेच. निर्गुण मनुष्य प्रत्येक घास घेताना ‘गोविंद’ ‘गोविंद’ असे गोविंदाचे स्मरण करत असतो, असे केल्याने अन्न शुद्ध होते. शुद्ध अन्न हाच निर्गुणाचा आहार होय. तो स्वतः ब्रह्मरूप असतो, अन्नालाही तो ब्रह्मच समजत असतो आणि पंक्तीस असणाराही ब्रह्मस्वरूपच आहे अशी त्याची मनोमन खात्री असते. उद्धवा इतर गोष्टींप्रमाणे तीन गुणांचे सुखही तीन प्रकारचे असते आणि निर्गुणाचे सुख तर अलौकिक आहे. आत्मचिंतनाने प्राप्त होणारे सुख सात्त्विक, विषयांपासून प्राप्त होणारे राजस, मोह आणि दीनतेने प्राप्त होणारे सुख तामस आणि जे सुख माझ्या आश्रयाने मिळणारे ते गुणातीत समजावे. याबद्दल तुला सविस्तर सांगतो. विषयसुखाची स्फूर्ती सोडून देऊन आत्मसुखानेच चित्तवृत्ती आनंदित करणारे सुख खरोखर सात्त्विक होय. विषयापासून मिळणारे सुख तात्पुरते असते आणि ते शेवटी या ना त्या रूपाने दुःखच देते. एक तर ते कधी ना कधी संपुष्टात येते म्हणून दुःखदायक किंवा कितीही प्रयत्न केले तरी हाती लागत नाही. म्हणून दुःखप्रद होते. त्याउलट एकदा आत्मसुख मिळू लागले की त्याला ओहोट हा शब्द माहित नसतो. ज्याप्रमाणे गंगेच्या पुराला भरती आली असता ओढे नाले आपोआपच भरून जातात, त्याप्रमाणे आत्मसुखाचा लाभ झाला की, त्या आनंदाने इंद्रियांचीही तृप्ती होऊन जाते. राजस माणसाची सुखाची कल्पना वेगळीच असते. त्याला नानाप्रकारच्या विषयांची आवड, इंद्रियांचा अतिशय धुमाकूळ, विषयसुखाची लयलूट म्हणजे राजसाचे सुख होय. आणखी उद्धवा! अत्यंत निंद्य आणि माद चढणारें जें सुख असते, तेच बुद्धीला आवडणे हीच खरोखर तामससुखाची सिद्धी होय. हृदयामध्ये माझी मूर्ती प्रगट झाली की, संसाराची इच्छा विसरून जाते आणि त्यानंतर जो सुखाचा लाभ होतो, ते सुख खरोखर निर्गुण सुख होय. सर्व प्राणिमात्रांमध्ये परमेश्वर राहतो तोच मी, हे तत्त्व ओळखून तशा माझ्या ऐक्मयानेच जे सुख प्राप्त होते तेच निर्गुणाचे खरे आत्मसौख्य होय. आत्मस्वरूपाच्या सुखाचे स्वरूप दृष्टीस पडले म्हणजे आपण स्वतःही सुखस्वरूप होतो. पापाचा आणि पुण्याचा झाडा झाला म्हणजेच हे निर्गुणसुखाचे दीप हाती लागतात.
क्रमशः








