नव्या अध्ययनातून खुलासा
एका नव्या अध्ययनातून भीतीदायक निष्कर्ष निघाला आहे. अधिक वायू प्रदूषणयुक्त शहर किंवा भागात वास्तव्य करत असल्यास तुमची हाडं आणखी कमजोर होत जाणार आहेत. ऑस्टियोपोरोसिस सारखे क्रॉनिक आजार अधिक प्रमाणात होतील. हाडं मोठय़ा प्रमाणात कमकुवत होत ती प्रॅक्चर होण्याचे प्रमाण वाढणार असल्याचे अध्ययन अहवालात म्हटले गेले आहे.
वयासोबत ऑस्टियोपोरोसिस होण्याची शक्यता वाढत जाते. मागील 6 वर्षांपासून 9041 महिलांचा डाटा जमविला जात होता. मेनोपॉज झालेल्या महिलांचा यात समावेश होता. या अध्ययनादरम्यान वैज्ञानिकांनी या महिलांच्या हाडांमध्ये खनिजांच्या घनत्वाची पडताळणी केली आहे. म्हणजेच मिनरल्सची डेन्सिटी तपासली आहे.

वैज्ञानिकांनी या महिलांच्या घरांच्या आसपास नायट्रिक ऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फ डायऑक्साइड आणि पीएम10 ची तपासणी केली आहे. तसेच या महिलांच्या रेड ब्लड सेल्ससंबंधी डाटा मिळविला आहे. ज्या भागांमध्ये विषारी वायू आणि प्रदूषणाची पातळी अधिक होती, तेथील महिलांची हाडं अत्यंत कमकुवत होती असे आढळून आले आहे.
कुठल्याही माणसाच्या हाडांची मजबुती केवळ त्याच्या आहारावर निर्भर नसते. तर तो कुठे राहतो, तेथील हवामान कसे आहे, प्रदूषण किती आहे या घटकांचेही मोठे योगदान असते. ज्या शहरांमध्ये अधिक प्रमाणात वायू प्रदूषण असते, तेथे हाडं प्रॅक्चर होण्याचा धोका अधिक असतो. हाडांमधील शक्ती दिवसेंदिवस कमी होत जात असल्याचे न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठाच्या बायोमेडिकल सायंटिस्ट डिडियर प्राडा यांनी सांगितले आहे.
नायट्रोजन ऑक्साइड्समुळे अधिक नुकसान
प्राडाच्या अध्ययनानुसार नायट्रोजनशी निगडित प्रदूषक घटकांचा थेट परिणाम मानवी कण्यावर होत आहे. मागील तीन वर्षांमध्ये नायट्रोजनशी निगडित प्रदूषक घटकांमुळे कण्याच्या हाडांच्या समस्यांमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. या हाडांमध्ये खनिजांचे घनत्व 12 टक्क्यांनी कमी झाले आहे.









