भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप : विमा घेताना संबंधित कंपनीला सूचना करण्याची गरज
बेळगाव : शेतकऱ्यांकडून खरीप, रब्बी पिकासाठी विमा घेतला जातो. मात्र पीक खराब झाल्यानंतर त्याचा सर्व्हे करून त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात नाही. त्यामुळे विम्याचा काय उपयोग? असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. पीक विमा द्यायचा नाही तर तो भरून तरी कशाला घ्यायचा? केंद्र सरकार या विम्यासाठी जनजागृती करते. याचबरोबर शेतकऱ्यांकडून काही रक्कम घेतली जाते. मात्र नुकसान होऊनही विमा मिळत नाही, असा आरोप शेतकरी करत आहेत. सरकारने निश्चित केलेल्या विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. पण विमा कंपनीचा कोणताही अधिकारी पिकांचा सर्व्हे करत नाही. य् ााचबरोबर काही शेतकऱ्यांना विमा दिला जातो. तर काही शेतकऱ्यांना नुकसान होऊनही विमा मिळत नाही. देण्यात येणारा विमादेखील अत्यंत तुटपुंजा असतो. त्यामुळे त्यामधून शेतकऱ्यांचे विविध प्रकारे नुकसान होत असल्याचा आरोप होत आहे. सरकारने पिकावरही विमा योजना सुरू केली आहे. पावसाअभावी किंवा इतर कारणाने पिकांचे नुकसान झाले तर विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, असे जाहीर केले आहे. यामुळे बरेच शेतकरी पीक विमा भरतात. पण रक्कम घेऊनदेखील कोणतीच नुकसानभरपाई संबंधित कंपनीने दिली नाही. त्यामुळे विम्याची रक्कम भरण्याकडेही आता शेतकऱ्यांनी कानाडोळा केला आहे. नुकसानभरपाई होऊनदेखील शेतकऱ्यांना विमा दिला गेला नाही. यामुळे एकप्रकारे शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचाच प्रकार करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित
राष्ट्रीयीकृत बँक तसेच विविध केंद्रांमध्ये शेतकऱ्यांकडून विमा आकारला जातो. अतिपाऊस किंवा पावसाने दडी मारल्यानंतर नुकसान झाले तर त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. मात्र गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये अनेकवेळा पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. मात्र नुकसानभरपाई दिली गेली नाही. नुकसानभरपाई मिळावी यासाठी शेतकरी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवितात. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांची ही फसवणूक होतानाच दिसत आहे. बेळगाव तालुक्यामध्ये भात, बटाटा, सोयाबिन, भुईमूग यासारखी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत. ऊसदेखील पिकविला जातो. मात्र उस पिकाला विमा दिला जात नाही. तसेच ऊस पिकाच्या नावाने विमादेखील घेतला जात नाही. मात्र उर्वरित पिकांसाठी विमा भरून घेतला जातो आणि नुकसानभरपाई दिली जाते. मात्र शेतकऱ्यांना विम्याची रक्कमच दिली जात नाही, असे प्रकार वारंवार घडत आहेत.
योग्य विमा कंपनीचीच नियुक्ती करा
विमा कंपन्यांची नियुक्ती करताना त्यांना योग्यप्रकारे सल्ला देणे गरजेचे आहे. अन्यथा या शेतकऱ्यांकडून तसेच सरकारकडून कोटी रुपये या विमा कंपन्या हडप करण्याचा प्रकार होताना दिसत आहे. पावसाअभावी बटाटा, भात व इतर पिके गेल्या काही वर्षांमध्ये वाया गेली होती. याबाबत अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली नाही व विमाही दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसत आहे. आता रब्बी पीक आल्यानंतर खरीप पिकाच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी योग्य विमा कंपनीचीच नियुक्ती करावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांतून जोर धरत आहे.









