लोणावळा / वार्ताहर :
जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर लोणावळय़ातील रिदम हॉटेलसमोर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.
दीपक परशुराम पवार (वय 40) व लक्ष्मण तातुराम वाघमारे (30, दोघेही रा. सावरोली, खोपोली, रायगड) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे असून, दोघेही वीटभट्टी कामगार होते. ते सख्खे साडू होते.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक आणि लक्ष्मण हे दोघे सख्खे साडू लोणावळय़ाजवळील देवघर येथील एका वीटभट्टीवर वीटभट्टी कामगार म्हणून काम करत होते. ते रविवारी काही कामानिमित्त त्यांच्या गावी दुचाकीवरुन गेले होते. रविवारी रात्री ते पुन्हा गावाहून देवघरला परत येताना जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर लोणावळय़ातील रिदम हॉटेलसमोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही तात्काळ रुग्णवाहिकेतून नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शकील शेख करीत आहेत.
अधिक वाचा : ‘अग्निपथ’ योजनेविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या








