ग्रामसभेत उमटले पडसाद
फोंडा : वाडी-तळावली पंचायत क्षेत्रात सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारात ग्रामस्थांचा प्रखर विरोध असतानाही उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरनंतर महालक्ष्मीनगर येथे होऊ घातलेल्या टॉवरलाही स्थानिकांनी विरोध केला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत टॉवरच्या मुद्द्यावऊन जोरदार चर्चा झाली. महालक्ष्मीनगर तळावली येथे प्रभाग 7 मध्ये लोकवस्तीला लागूनच खासगी जागेत हा मोबाईल टॉवर उभारण्यात येत आहे. टॉवर लोकवस्तीच्या अगदी जवळ असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर रेडिएशनचा परिणाम होणार असल्याची भिती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याला परवाना दिला आहे. मात्र पंचायतीने टॉवरचा परवाना आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगून हात झटकले आहेत. पंचायतीला हा विषय लागत नसल्यास टॉवरच्या माध्यमातून भाड्यापोटी येणारा महसूल पंचायत कोणत्या आधारावर स्वीकारणार आहे ? असा प्रश्न विरोध करणाऱ्या ग्रामस्थानी ग्रामसभेत उपस्थित केला. शिवाय नियोजित टॉवरच्या अवघ्या पन्नास मिटरच्या परिघात आणखी एक मोबाईल टॉवर असताना दुसरा टॉवर हवाच कशाला असे स्थानिकांचे म्हणणे आहे. नियोजित मोबाईल टॉवर लोकवस्तीपासून लांब दुसऱ्या जागेत उभारावा, अशी मागणी करणारे लेखी निवेदन स्थानिकांनी फोंडा उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, वाडी तळावली ग्रामपंचायत व इतर संबंधितांना सादर केले आहे. विरोधानंतरही टॉवरचे काम जोरात सुऊ आहे.









