रहिवाशांच्या प्रतिक्रिया : धुळीमुळे वडगाव-अनगोळ रोड शेजारील रहिवासी हैराण : रस्ता दुऊस्तीचे काम अर्धवटच
बेळगाव : वडगाव-अनगोळ संपर्क रस्त्याचे काम अद्यापही अर्धवट असल्याने रहिवाशांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. धुळीमुळे येथील रहिवासी हैराण झाले असून, घरातदेखील तोंडाला मास्क लावण्याची वेळ आली आहे. स्वत:चे घर असल्याने निर्माण झालेल्या स्थितीला तोंड देतो, अन्यथा घर सोडून दुसरीकडे राहिलो असतो, अशा प्रतिक्रिया रहिवासी व्यक्त करीत आहेत. रस्त्याच्या विकासाचे काम सुरू करून वर्ष उलटले पण अद्यापही हे काम अपूर्णच आहे. रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून, काही ठिकाणी खोदून ठेवण्यात आल्याने वाहनधारकांना ये-जा करण्यास अडचणी येत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा गटारीचे बांधकाम व नाल्यावरील सीडीचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. पण ही कामेदेखील ठिकठिकाणी अपूर्ण आहेत. रस्त्याच्या विकासाचे काम संथगतीने सुरू असल्याने निर्माण झालेल्या समस्येला रहिवाशांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या हा रस्ता खूपच खराब झाला असून, प्रत्येक घरामध्ये धूळ साचली आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना देखील धुळीचा सामना करावा लागत आहे.
धुळीमुळे घरात देखील मास्क वापरण्याची वेळ आली आहे. विशेषत: वृद्ध नागरिकांना धुळीमुळे आरोग्याच्या तक्रारींना तोंड द्यावे लागत आहे. स्वत:चे घर असल्याने निर्माण झालेल्या समस्येचा सामना करीत आहोत. जर भाडोत्री घरात राहिलो असतो तर यापूर्वीच घर रिकामी करून अन्यत्र गेलो असतो, अशा प्रतिक्रिया काही नागरिक व्यक्त करीत आहेत. या रस्त्याच्या कामामुळे सर्वच नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्याच्या विकासाचे काम पूर्ण होण्यास आणखीन किती वर्षाचा कालावधी लागणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. खानापूर रोडच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू करण्यात आल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. त्यामुळे अनगोळमधील रहिवाशांना वडगावमार्गे शहरात येण्यास सोयिचे ठरू शकते. पण हा देखील रस्ता अपूर्ण असल्याने वाहनधारकांची गोची झाली आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे रहिवाशांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अर्धवट कामे तातडीने पूर्ण करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.









