नळपाणी योजनेसह दैनंदिन व्यवहार कोलमडले : पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ, नागरिकांचे हाल
वार्ताहर /जांबोटी
जांबोटी-कणकुंबी भागात गेल्या काही दिवसांपासून अनियमित व कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्यामुळे पुरेशा विजेअभावी या भागातील नळपाणीपुरवठ्यासह विजेवर चालणारे दैनंदिन व्यवहार ठप होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. जांबोटी विभागातील सुमारे 30 ते 35 गावांसाठी बेळगाव (मच्छे) येथील वीज वितरण केंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र जांबोटी भागासाठी उपवीज केंद्राची सुविधा अद्याप उपलब्ध नसल्यामुळे या भागाला थेट वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येत असल्याने या भागातील वीजपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात तांत्रिक समस्या उद्भवत आहेत. या भागातील विजपुरवठ्यावर विपरीत परिणाम होत असल्यामुळे अपुऱ्या तसेच अनियमित वीजपुरवठ्यामुळे जनतेचे हाल होत आहेत. दिवसभरातून तीन ते चार तास तरी वीजपुरवठा गायब होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे वीजपुरवठ्याच्या मागणीत वाढ झाली आहे. जांबोटी भागातील वीजपुरवठा केवळ वीजवाहिन्यांद्वारे होत असल्यामुळे वाढीव विजेचा भार वीजवाहिन्यांवर पडून वीजपुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे या भागात गेल्या काही दिवसापासून कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्यामुळे या भागातील अनेक गावातील नळपाणीपुरवठा पुरेशा विजेअभावी ठप्प झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच दळप-कांडप व विजेवर चालणाऱ्या इतर व्यवसायांवर देखील विपरीत परिणाम होत असल्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तसेच कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत मोटारी व इतर विद्युत उपकरणे देखील निकामी झाली आहेत.
शेतवडीतील पाणीपुरवठा करणे कठीण
कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे ओलमनी येथील नळपाणी योजनेची विद्युत मोटर गेल्या चार दिवसापूर्वी जळाल्यामुळे पाणीपुरवठा ठप्प झाला. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच वीजपुरवठ्याअभावी शेतवडीमधील पिकांना वेळेत पाणीपुरवठा करणे देखील शेतकरीवर्गाला अशक्मय झाले आहे. तरी खानापूर हेस्कॉम उपविभागाच्या अधिकारी वर्गाने लक्ष घालून जांबोटी भागातील वीजपुरवठ्यात उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्या दूर करून या भागाला सुरळीत वीजपुरवठा करावा व विजेअभावी नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.









