दुर्दैवाचे दशावतार कशाला म्हणतात असे जर सध्या कोणी विचारले तर बऱ्याच विरोधी पक्षांकडे बोट दाखवता येईल. कोणी थोडा कमनशिबी तर कोणी थोडा जास्त इतकाच काय तो फरक. कोणापुढे अस्तित्वाचा प्रŽ आ वासून उभा राहिला आहे तर कोणाला आता आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे त्याचा पत्ताच नाही.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर विरोधी पक्षांचे काय हाल होतील, याची चांगली जाण असूनही त्यांना कळतय पण वळत नाही. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि के चंद्रशेखर राव यांच्यासारखे गैरकाँग्रेसी नेते एकीकडे महत्त्वाकांक्षी झाले आहेत. तर भारत जोडो यात्रेच्या यशाने राहुल गांधी एका वेगळ्याच विश्वात आहेत. या साऱ्याचा परिणाम म्हणजे भाजप विरोधकांची अवस्था ही चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूप्रमाणे झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची नाव आणि निशाणी काढून घेतल्याने बाळ ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा जणू कणाच मोडून टाकलेला आहे. आता यापुढे ते कसे लढणार हे जेव्हढे महत्त्वाचे आहे तेव्हढेच इतर प्रादेशिक पक्षदेखील कितपत तग धरणार? कोण शरणागती पत्करणार? कोण लोटांगण घालणार? कोण आपणहून मांडलिक बनणार? कोण खुशमस्करे बनणार? हे पुढील वर्षभरात दिसणार आहे. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील या कारवाईने आपल्या विरोधकांना विखुरण्याचे काम अतिशय अलगदरीतीने केलेले आहे. महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ आता कितपत टिकून राहणार, अशी चर्चा तरी सुऊ झाली आहे. सगळीकडे विरोधक धास्तावलेले आहेत.
एकीकडे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचे काम चालवले असताना भाजपने बिहारमध्ये देखील लालू यादव-नितीश कुमार यांच्या सत्ताधारी आघाडीत फूट पाडण्याचे काम सुऊ केले आहे. गेल्या आठवड्यात माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी संयुक्त जनता दलातून बाहेर पडून जी वेगळी चूल मांडली आहे ती भाजपला मदत करण्यासाठीच होय. चिराग पासवान हेदेखील नितीश-लालुविरोधी आघाडीत पहिल्यापासून सामील झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद केलेल्या विनोद तावडे यांची ड्युटी भाजपश्रेष्ठींनी बिहारमध्ये लावली आहे. तात्पर्य काय तर अदानी घोटाळा, ‘बीबीसी’वरील धाड अशा एकानेक वादात अडकलेल्या भाजपची नजर सत्तारूपी माशापासून विचलित झालेली नाही आणि ती हळूहळू आपल्या सोंगट्या फिट करू लागली आहे. ‘साम दाम दंड भेद’ असे कोणतेही शस्त्र वापरून विरोधकांची पांगापांग कशी करायची याचे अजब तंत्र राज्यकर्त्यांकडे आहे. मीडियामधून केवळ मोदींचा उदोउदो होत आहे. हवेत तणाव आहे. भलेभले सावध झालेले आहेत.
अशा स्थितीत विरोधी पक्ष हातात हात धरून गप्प राहिलेले आहेत असे नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला 100च्या आत उखडवायचे असेल तर काँग्रेसने पुढाकार घेऊन विरोधी ऐक्मय केले पाहिजे असे नितीश कुमार यांनी जरूर सुचवले आहे. पण ऐक्मय म्हणजे ‘पी हळद आणि हो गोरी’ अशातला प्रकार नसल्याने हे सारे दमानेच केले पाहिजे याची काँग्रेसला जाणीव आहे.
रायपूरमध्ये सुऊ असलेल्या महाअधिवेशनातून याबाबतची काँग्रेसची भूमिका समोर येणार असली तरी भाजपशी दोन हात करायला इतर विरोधी पक्ष कितपत कटीबद्ध आहेत याविषयीच काँग्रेसला साशंकता आहे. विरोधी ऐक्मयाची हाळी देणाऱ्यात हवशे-नवशे-गवशेच अधिक आहेत. जीव छोटा असल्याने प्रादेशिक पक्ष हे सत्ताधाऱ्यांशी छुपी हातमिळवणी करतात आणि वरकरणी विरोधी ऐक्मयाच्या बाता करतात असेही बरेचदा दिसून आले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या एक-दीड वर्ष अगोदर नितीश हे विरोधी पक्षातील पंतप्रधानपदाचे उमेदवार समजले जायचे. अशावेळीच त्यांनी अचानक भाजपशी घरोबा करून बिहारमध्ये लालूंच्या पक्षाला सत्ताभ्रष्ट केले होते. विरोधी पक्षांचे राजकारण म्हणजे एक फसवी मायानगरी आहे. ममता बॅनर्जी एकीकडे स्वत:ला गैरकाँग्रेसी विरोधकातील पंतप्रधानपदाचा दावेदार भासवतात तर दुसरीकडे त्या भाजपशी छुपे संगनमत करतात. मोदींना तिसऱ्या वेळेला पंतप्रधान बनवायचे आहे तर दीदींना मुख्यमंत्रीपद टिकवायचे आहे त्यातून एक वेगळे राजकारण जन्म घेतेय. बिजू जनता दलाला केंद्रात कोणीही सत्तेत आलेतर चालते. नवीन पटनाईक यांना गोडीगुलाबीत ठेवून भाजप त्यांच्याकडून समर्थन मिळवत आली आहे.
गेल्या आठवड्यात मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी यांनी लालू यादव यांची भेट घेतली. किडनी ट्रान्सप्लान्टचे ऑपरेशन करून लालू नुकतेच सिंगापूरहून परतले आहेत आणि राजधानीत विश्र्रांती घेत आहेत. ही भेट फक्त तब्येतीची विचारपूस करण्यासाठी नक्कीच नव्हती. भाजपने विरोधकांपुढे एक महाआव्हान उभे केले आहे आणि त्याबाबत फारसे काही जाहीरपणे बोलताच येत नाही. अशा प्रकारची खलबते म्हणजे काहीतरी खिचडी शिजत आहे. नक्कीच पण तिच्यात कोणते जिन्नस जाणार ते यथावकाशच समजणार. मोदी यांचे अतिशय कडवे समर्थक मानले गेलेले सुदर्शन न्युजचे सुरेश चव्हाणके यांनी ट्विटर या समाज माध्यमावर एक पोल (जनमत चाचणी) घेतली. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून तुम्हाला कोण पसंत आहे अशी त्यात विचारणा केली गेली होती. त्यात लोकांनी जी निवड केली ती सत्ताधाऱ्यांची झोप उडवणारी आहे. या चाचणीत मोदी यांच्या बाजूने 44 टक्के मते पडली तर राहुल गांधी यांना 51 टक्के लोकांनी पाठिंबा दिला. नितीशकुमार यांना अवघ्या दोन टक्क्मयांची तर ममतादीदींना केवळ एक टक्क्याची साथ मिळाली.
सहा दिवस हा पोल चालणार होता पण अचानक असे वेगळे चित्र दिसल्याने चव्हाणके यांनी दीड दिवसातच ही चाचणी गुंडाळली असे जाणकार सांगतात. याचा अर्थ म्हणजे भारत जोडो यात्रेनंतर राहुल हे ‘तपस्वी’ झालेले आहेत आणि त्यांची लोकप्रियता बरीच वधारली आहे. याचा दुसरा अर्थ असा की भाजपला केवळ काँग्रेसच टक्कर देऊ शकेल अशी अटकळ जनमानसाने बांधली आहे. बाकी सारे चिल्लर आहेत अशी त्यांची भलीबुरी समजूत झालेली आहे. काँग्रेसश्रेष्ठीना देखील आपल्या बाजूने अशी सुप्त लाट जाणवत असेल तर विरोधकांची आवळ्याभोपळ्याची मोट बांधून राहुल आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणार नाहीत. चक्रव्यूहात अडकलेल्या विरोधकांचे पाणी काँग्रेसने जोखले आहे.
ऐक्याची माळ जपत असताना केवळ आपल्या अटींवरच प्रादेशिक पक्षांना मदत करण्याची काँग्रेस नीती राहील. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रातील पुढील सरकार हे काँग्रेसप्रणित युतीचे असेल असे सांगून या रणनीतीचे संकेत दिले आहेत. त्यानंतर मात्र विरोधी पक्ष संयुक्तपणे सरकार स्थापतील असे सांगून नेतृत्वाचा प्रŽ काँग्रेसने दूर ठेवला आहे असे दाखवले असले तरी ती म्हणजे प्रादेशिक पक्षांना चुचकारण्यासाठीची खेळी आहे इतकेच. राष्ट्रीय स्तरावर केवळ काँग्रेसचं भाजपचा विरोध करताना दिसत असल्याने लोकसभा निवडणुकीत त्याचा केवळ आपल्यालाच फायदा होईल असे राहुलना वाटते. भाजप असो अथवा काँग्रेस, प्रादेशिक पक्षांना स्पेस देण्याची भाजप आणि काँग्रेसची अजिबात तयारी नसल्याने ते चक्रव्यूहात फसले आहेत. गेली दहा वर्षे दोन निवडणुकांत काँग्रेसला विरोधी पक्ष नेत्याचे स्थान देखील लोकसभेत मिळवता न आल्याने त्याच्यासमोरील चक्रव्यूह निराळा आहे. हे चक्रव्यूह कोण आणि कसे भेदेल त्यावर 2024ची कथा लिहिली जाणार आहे. ‘एक मोदी सब पर भारी’ असे ठणकावून सांगत पंतप्रधानांनी श•t ठोकले आहेत. घोडामैदान जवळच आहे.
सुनील गाताडे








