घरामधली सारी मंडळी पिंजऱ्यातल्या लाडक्मया पोपटाला एकटे सोडून जेंव्हा एक दिवसासाठी बाहेरगावी गेली तेंव्हा पोपट ऊसून बसला. मंडळी घरी परतली तेंव्हा त्याने सगळ्यांकडे पाठ फिरवली आणि तो मान खाली घालून बसला. काही खाईना, बोलेना. दोन दिवसांनी त्याचा राग शांत झाला. माणसांसह सर्व प्राणीमात्रांजवळ क्रोध हा रिपू जन्मत: असतो. शेपटीवर पाय दिला की साप फणा काढतो. विंचू नांगी मारतो. शांत स्वभावाचे गाय, बैल देखील रागावले की हिंसक होतात. पशु पक्षांचे क्रोधामुळे प्राणरक्षण होते तर माणसांचे मात्र नुकसान होते. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, ‘नको रे मना क्रोध हा खेदकारी’ क्रोधामुळे दुसऱ्याच्या अंत:करणाला इजा होते. माणूस स्वत:च्या ताब्यात राहात नाही. समर्थ म्हणतात की आयुष्यात व्यवहार सुरळीत चालण्या इतपतच क्रोधाला महत्त्व द्यावे. पू. बाबा बेलसरे असे म्हणत ‘मनाचा क्षोभ करून अंतर्यामी अशांती निर्माण करणे हे विकारांचे प्रधान कार्य असते’. भक्तीच्या आड येणारा क्रोध हा विकार मनुष्याने आपल्या सोयीने त्याच्यावर स्वामित्व गाजवून वापरावा.
क्रोधामुळे माणसाच्या शरीरात नेमके होते तरी काय? संस्कृतचे गाढे अभ्यासक आणि विद्वान डॉ.रा. ल. जोशी यांनी एक सत्य घटना सांगितली आहे. मिरज येथे भडकमकर नावाचे डॉक्टर होते. धन्वंतरी म्हणून त्यांचा लौकिक होता. एक दिवस एक बाई आपल्या ओक्साबोक्शी रडणाऱ्या व काळे निळे पडलेल्या बाळाला घेऊन या डॉक्टरांकडे आली. डॉक्टरांना निदान करता येईना. त्यांची मती कुंठीत झाली. असा त्यांना अनुभवच नव्हता. बाळाच्या आईला बाळ रडण्यापूर्वी काय झाले हे विचारले तेंव्हा तिने सांगितले की तिचे एका बाईबरोबर जोरदार भांडण झाले. भांडण चालले असतानाच तिने बाळाला अंगावर दूध पाजले. तेंव्हापासून बाळाची अशी स्थिती झाली आहे. डॉक्टर म्हणाले, ‘हे बाळ आता जगणार नाही. क्रोधामुळे तुमच्या शरीरात विष उत्पन्न झालं आणि तेच दुधाद्वारे बाळाच्या पोटात गेलं आहे.’ दुर्दैवाने ते बाळ दगावले. अनेक जणांना क्रोधाचा अभिमान वाटतो. त्यापेक्षा त्याचा उबग येणे हे योग्य आहे. क्रोध हा बाह्यात्कारी असावा. असे संतांनी सांगितले नाहीतर त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात आजारपण वाट्याला येते. आमचे गोत्र जमदग्नी आहे. घरात बहुतेक जण तापट आहेत. असे काही कुटुंबीय मोठ्या अभिमानाने सांगतात. महषी जमदग्नी म्हणजे क्रोध असे समीकरण समाजात ऊजले आहे ते चुकीचे आहे असेच म्हणावे लागेल. कारण महषी जमदग्नींनी क्रोधावर विजय मिळवला होता. आदिशक्ती रेणुकेचा वध झाल्यानंतर जमदग्नी ऋषी क्रोधावरच क्रोध करून म्हणाले, ‘अरे निर्दय, दूराचारी क्रोधा तुझ्यामुळे माझ्या हातून स्त्रीवध झाला. तू माझ्या शरीरातून निघून जा’. तेंव्हा जळलेल्या काळ्या वृक्षासारखा भयंकर असणारा क्रोध जमदग्नीसमोर सगुण साकार होऊन प्रकट झाला आणि हसत म्हणाला, ‘मुनीवर मी नाही असे जगतात काहीतरी तरी आहे काय? विश्वाचा आधार आणि संहार मीच आहे. ‘चालता हो’ असे सांगणाऱ्या जमदग्नी ऋषींना क्रोध परोपरीने म्हणत होता,’ मी सत्य सांगतो तुम्हाला माझी आवश्यकता भासेल. माझा त्याग करू नका. ऋषी ठामपणे म्हणाले, ‘तू माझ्या शरीरातून निघून जा. नाईलाजाने क्रोध निघून गेल्यानंतर जमदग्नी ऋषी जीतक्रोध झाले. क्रोधाने एक दिवस जमदग्नी ऋषींकडे पितृतिथी असताना सर्प रूपात प्रवेश करून श्र्रद्धासाठी तयार केलेल्या खिरीमध्ये आपले विष ओतले. जमदग्नीच्या लक्षात येऊनही ते शांत राहिले. त्यांना राग आला नाही. हे बघून क्रोधाने त्यांची स्तुती केली. सहस्त्रार्जुन राजाने जमदग्नी ऋषींच्या आश्र्रमातील कामधेनूचे हरण केले तेंव्हा देखील ऋषी रागावले नाहीत. मात्र पित्याचा झालेला अपमान भगवान परशुरामांना सहन झाला नाही. त्यांनी संहाराची घोर प्रतिज्ञा केली. तेंव्हा अतिशय शांततेने जमदग्नी ऋषींनी शाश्वत धर्माची शिकवण आपल्या पुत्राला दिली. रामायणातील राम आणि लक्ष्मण या एकरूप जोडीतील लक्ष्मणाचा स्वभाव कोपिष्ट आहे परंतु श्रीरामांच्या सांगण्यावरून लक्ष्मण नेहमी लगेच शांत झालेले दिसतात. राजा दशरथाने श्रीरामांना वनवासात जाण्याची आज्ञा केली तेव्हा लक्ष्मणाने मोठ्याने बोलत राग व्यक्त करीत म्हटले, ‘राजाची बुद्धीक्षमता लोप पावली आहे काय? ते कैकयीमातेचे ऐकून असे का वागत आहेत? श्रीरामांनी कुणाचे काहीही न ऐकता राज्य ताब्यात घ्यावे.’ तेंव्हा श्रीराम म्हणाले, ‘लक्ष्मणा हे सारे दैवाधिन आहे. यात कुणाचाही दोष नाही. पितृआज्ञेचे पालन करणे हे माझे कर्तव्य आहे.’ शांत, संयमी असणाऱ्या सीतामातोश्रींनी एकदाच कठोर भाषण करून लक्ष्मणाची निर्भत्सना केली तेंव्हाही लक्ष्मण शांतच राहिले. ते वनदेवतांना म्हणाले की, सीतामाईचे तुम्ही रक्षण करा. किष्किंधेमध्ये राज्य करणाऱ्या सुग्रीवाने सीतामातेच्या शोधात दिरंगाई केली ते बघून साऱ्या किष्किंधा नगरीला नष्ट करून टाकण्याचा क्रोध लक्ष्मणाने व्यक्त केला. तेंव्हा ‘तारा’ लक्ष्मणासमोर उपस्थित झाली. तिला बघताच लक्ष्मणाचा राग भराभर कमी झाला. सुसंस्कृत खानदानीपणा त्यातून दिसून येतो. दुर्वास ऋषींना राग येऊन त्यांनी अयोध्येला व श्रीराम परिवाराला शाप देऊ नये म्हणून लक्ष्मणाने रामाच्या आज्ञेचे उल्लंघन केले. राजाज्ञा मोडली म्हणून शरयू नदीकिनारी जाऊन श्वासविरोध करून देहत्याग केला. श्रीरामांच्या इच्छेत इच्छा मिसळून राहणाऱ्या लक्ष्मणाचा क्रोध हा सात्विक आणि शांततेकडे झुकणारा आहे.
समर्थ रामदास स्वामी रचित श्री शंकराच्या आरतीमध्ये शंकराच्या रूपाचे वर्णन आहे. ‘लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा विषेकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा’ महादेवाचे हे विक्राळ ब्रम्हांडे भस्मसात करणारे रौद्ररूप आहे. शिवाला क्रोध आला की तो तिसरा नेत्र उघडतो. शिव ही देवता केवळ संहारक नाही तर ती सृजनाची देवता आहे. शिवाच्या मस्तकी गंगा आहे त्यातून पुन्हा जिवांचा जन्म आहे. शिवाचा क्रोध तात्काळ मावळणारा आहे. क्रोधामुळे आयुष्यात अनर्थ होतात. एका क्षणात नाती संपतात जीवन उद्ध्वस्त होते. क्रोधावर मात करण्याचा उपाय एकच तो म्हणजे क्षमा. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींचा एक अभंग आहे, ‘अरे अरे ज्ञाना झालासे पावन’ सद्गुऊ निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे आपल्याला आत्म तृप्तीचा अनुभव आला असे माऊली म्हणतात. या अभंगात ते शेवटी म्हणतात, ‘निवृत्ती परमानुव नेमा। शांतीपूर्ण क्षमा ज्ञानदेवो। यात’ शांतीपूर्ण क्षमा’ हा शब्द महत्त्वाचा आहे. जेंव्हा मनात क्रोध किंवा अगतिकता असते तिथे क्षमा नांदत नाही. ज्ञानेश्वर माऊलींचं अंतकरण म्हणजे शांतीचा अथांग सागर आहे. वृत्तीची निवृत्ती झाल्याने सर्वत्र विष्णूच दिसत आहेत. क्षमा हे परमेश्वराचेच एक रूप आहे. साक्षात्कारानंतर ते अनुभवायला येते. आपल्याला क्रोध आला की माऊलींना मनोमन नमस्कार करावा. शांतीचा अनुभव घ्यावा हेच खरे !
-स्नेहा शिनखेडे








