दक्षिण चीन समुद्रावर चिनी वैमानिकाने धमकाविले
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
चीनच्या जे-11 लढाऊ विमानाने अमेरिकेच्या नौदलाच्या विमानाला दक्षिण चीन समुद्रावर रोखले आहे. अमेरिकन विमान पॅरासेल बेटापासून सुमारे 30 मैल अंतरावर असताना हा प्रकार घडला आहे. हा वादग्रस्त बेटानजीक 130 अन्य छोटी बेटे असून तेथे चीनचा सैन्यतळ आहे.
अमेरिकेचे पी-8 पोसेडियन गस्त विमान दक्षिण चीन समुद्रावरून उड्डाण करत असताना चिनी लढाऊ विमान त्याच्यासमोर आले. तर ग्राउंड स्टेशनवरून चिनी वायुदलाने अमेरिकेच्या विमानाला जर आणखी पुढे पोहोचल्यास परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा अशी धमकी दिली होती.
याच्या काही मिनिटांनी क्षेपणास्त्रांनी युक्त एक चिनी लढाऊ विमान अमेरिकेच्या विमानाला रोखण्यासाठी त्याच्या पोर्ट साइडपासून केवळ 500 फूटांच्या अंतरावर आले. यानंतर अमेरिकेच्या विमानातील वैमानिक लेफ्टनंट निक्की स्लॉटर यांनी चिनी वैमानिकाला प्रत्युत्तर देत हे अमेरिकेच्या नौदलाचे विमान असून आम्ही पश्चिमेच्या दिशेने जात असून तुम्हीही परतावे असे सुनावले होते. अमेरिकन वैमानिकाच्या या संदेशानंतर रेडिओवर चीनचा कुठलीच प्रतिक्रिया आली नाही. चिनी लढाऊ विमानाने पुढील 15 मिनिटांपर्यंत अमेरिकेच्या विमानाला एस्कॉर्ट केले आणि मग माघारी परतले.
यापूर्वी मागील वर्षी 21 डिसेंबर रोजी देखील एक चिनी लढाऊ विमान अमेरिकेच्या वायुदलाच्या विमानाला धडकण्यापासून बचावले हेते. दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या वायुदलाचे आरसी-135 विमान नियमित मोहिमेवर होते. याचदरम्यान चिनी लढाऊ विमान अमेरिकेच्या विमानाच्या अत्यंत नजीक आल्याने दोघांमधील अंतर केवळ 20 फूट शिल्लक राहिले होते. या घटनेनंतर अमेरिकेच्या सैन्याने चिनी सैन्याच्या वैमानिकावर धोकादायक पद्धतीने जे-11 लढाऊ विमानाचे उड्डाण करण्याचा आरोप केला होता.
22 चौरसकिमीचा वादग्रस्त भाग
दक्षिण चीन समुद्रात चीन 12 सागरी मैल किंवा सुमारे 22 चौरस किमी भागावर स्वतःचा हक्क दर्शवित आहे. या भागाला ‘12 नॉटिकल मैल टेरिटोरियल लिमिट’ म्हटले जाते. हा भाग दक्षिण चीन समुद्रात निर्मित कृत्रिम बेटानजीकचा आहे. चीनसोबत दक्षिणपूर्व आशियातील अनेक देश तैवान, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, ब्रुनेई आणि मलेशिया देखील या भागावर स्वतःचा दावा सांगत आहे.









