ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कसबा पोटनिवडणुकीत भाजपने पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात अनेकदा निवडणुकीत पोलिसांच्या मदतीने पैसे वाटले गेले आहेत. पोलिसांच्या वाहनांमधूनच पैशांची देवाण-घेवाण होत असते. मागच्या निवडणुकीत सुद्धा पोलिसांच्या मदतीने भाजपने पैसे वाटल्याचे पुराव्यानिशी समोर आले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत म्हणाले, महाराष्ट्रात अनेकदा पोलिसांच्या मदतीने निवडणुकीत पैसे वाटण्यात आले. मागच्या निवडणुकीत बारामती, पुणे भागात पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटले, हे पुराव्यासह उघड झालं आहे. पोलीसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात. त्यामुळे कसब्यात पोलिसांच्या मदतीने भाजपने पैसे वाटल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर करत आहेत, हे खरे असेल. धंगेकर यांच्याकडे त्याचे पुरावे असल्याचेही ते सांगतात.
अधिक वाचा : लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली होती, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मला फोन करुन मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला होता. त्यावर मीडियाने राऊतांना विचारले असता ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करायची सवय लागली आहे. महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतर घडत असताना फडणवीस विरोधी पक्षनेते होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. असा स्थितीत उद्धव ठाकरे फडणवीसांशी बोलले असतील. मात्र, इतक्या दिवसांनी सनसनाटी निर्माण करुन ते काय सांगू इच्छितात. त्यांना असे स्टंट करण्याची सवय लागली आहे. पूर्वीचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यात फरक आहे. फडणवीस हे सध्या उपमुख्यमंत्री आहेत, किती काळ राहतील हे सांगता येत नाही. दिल्लीची मर्जी, असा टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावला.








