श्वानांच्या हल्ल्यात यापूर्वी बळी जाऊनही मनपा प्रशासन उदासीनच : आणखी किती बळी हवेत? नागरिकांचा प्रश्न

बेळगाव : भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास महापालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे लहान मुलांना घराबाहेर सोडणे मुश्कील बनले आहे. अंगणात खेळणाऱ्या दोन बालकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून चेहऱ्याचे आणि डोक्याचे लचके तोडले आहेत. अत्यंत भयानक अशा हल्ल्यामुळे बालकांचे जीव धोक्यात आले आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यात जीव जाऊनदेखील मनपा प्रशासन ढीम्म असल्याने आणखी किती बळी हवेत? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. शहर आणि उपनगरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. पण केवळ नसबंदीचा उपक्रम राबवून या समस्येकडे मनपा प्रशासनाने कानाडोळा केला आहे. मात्र याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. दररोज कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्याकडे केली असता कुत्र्यांना मारण्याचा अधिकार नाही. प्राणी दया संघटनांच्या दबावापुढे केवळ नसबंदीशिवाय कोणतीच कारवाई करता येत नाही, असे सांगून आपली जबाबदारी झटकली आहे. पण दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मागील महिन्यात कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ बापट गल्ली परिसरात भटक्या कुत्र्याने 12 जणांवर हल्ला केला होता. त्यानंतर या कुत्र्याचा मृत्यू झाला. पण याची धास्ती सर्वसामान्य नागरिकांना लागून राहिली आहे. अशा घटना दररोज घडूनदेखील मनपा प्रशासन उदासीनच आहे. आतापर्यंत 1500 हून अधिक कुत्र्यांवर नसबंदी केल्याचे सांगण्यात येत आहे. पण हल्ला करणाऱ्या कुत्र्यांना पकडल्याबद्दल कोणतीच माहिती दिली जात नाही.
शुक्रवारी अंगणात खेळणाऱ्या बालकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे अनगोळ आणि शहापूर परिसरात दोन बालके जखमी झाले आहेत. शहापूर आचार्य गल्ली परिसरात भटकणाऱ्या एका कुत्र्याने चार वर्षाच्या रिद्धी कपिल माळवी या बालिकेच्या तोंडाचा लचका घेतला. त्यानंतर हातावर आणि पायावर चावा घेतल्याने रिद्धी ही गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सकाळी घडल्यानंतर दुपारी जेवणाच्या वेळेत अनगोळ परिसरात एका मुलावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली. इंदिरानगर येथील गल्लीमध्ये खेळत असताना जाणाऱ्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्यामुळे पाच वर्षाचा शिवराज मौर्य हा जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याचा आणि हाताचा चावा घेतला आहे. दोन्ही बालकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येत आहेत. लहान मुलांना गल्लीत खेळणे देखील मुश्कील बनले आहे. खेळतेवेळी कधी भटकी कुत्री हल्ला करून मुलांना घेऊन जातील हे आता सांगणे कठीण बनले आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे काहींना जीव गमवावे लागले आहे तरीदेखील मनपा प्रशासन अद्याप जागे झाले नाही. कुत्र्यांचा हल्ला होण्याचे प्रकार दररोज घडत असल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. महापालिका प्रशासनाला आणखी किती बळी हवेत? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. शाळेला जाणाऱ्या किंवा अंगणात खेळणाऱ्या मुलांवर भटकी कुत्री हल्ला करीत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.









