बंद घराचा कडी-कोयंडा तोडून लांबविले सोन्या-चांदीचे दागिने
बेळगाव : रायण्णानगर-मजगाव येथील एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सहा लाखांचे दागिने पळविले आहेत. शुक्रवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. उद्यमबाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. यासंबंधी कावेरी मोहन नाईक यांनी फिर्याद दिली आहे. पिरनवाडी उरुसानिमित्त कावेरी या आपल्या नातेवाईकांच्या घरी गेल्या होत्या. रात्री उशीर झाल्यामुळे गुरुवारी त्या नातेवाईकांकडे मुक्कामाला राहिल्या. शुक्रवारी सकाळी 6 वाजता आपल्या घरी परतल्या त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला असून कपाटातील 12 तोळे वजनाचे सोन्याचे व 8 तोळे वजनाचे चांदीचे दागिने पळविण्यात आले आहेत. घटनेची माहिती समजताच उद्यमबागचे पोलीस निरीक्षक रामाण्णा बिरादार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. सध्या बेळगाव परिसरात यात्रा, उरूस सुरू आहेत. त्यामुळे लोक उशिरापर्यंत घराबाहेर राहत आहेत. हीच संधी साधून गुन्हेगार सक्रीय झाले असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.









