जिल्हा पोलीसप्रमुखांकडे 57 जणांनी मांडले गाऱ्हाणे
बेळगाव : जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या फोन ईन कार्यक्रमाला जिल्ह्याबरोबरच बेळगाव शहरातूनही प्रतिसाद मिळाला आहे. 57 जणांनी पोलीस प्रमुखांशी संपर्क साधून आपले गाऱ्हाणे मांडले आहे. यापैकी बेळगाव शहरातील 14 जणांनीही पोलीसप्रमुखांशी संपर्क साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पोलीस यंत्रणा सध्या बंदोबस्ताच्या तयारीत आहे. त्यामुळे पोलीसप्रमुखांनी चौथ्या शनिवारऐवजी शुक्रवारी हा कार्यक्रम घेतला. सकाळी 9 ते 11 पर्यंत पोलीस मुख्यालयात फोन ईन कार्यक्रम झाला. वाहतूक समस्या, जमीनवाद, फसवणूक, बेकायदा दारूविक्री, चोरी प्रकरणाचा तपास, पार्किंगची समस्या, बेकायदा मातीची वाहतूक, व्याजीधंदा, मटका व्यवसाय, बेकायदा तांदूळ वाहतूक, गावगुंडांचा उपद्रव आदींविषयी नागरिकांनी पोलीसप्रमुखांकडे तक्रारी केल्या. अंगणवाडीतून मुलांना निकृष्ट आहार पुरवठा होत आहे, अशी तक्रार हिडकलमधून केली आहे. पत्रकारांवर कारवाई करण्यासंबंधीही बोरगाववाडीहून मागणी केली असून बेळगाव शहरातील गुंडांचा उपद्रव, वाहतूक समस्या, सायबर गुन्हेगारी, चोरी प्रकरणांचा तपास, गतिरोधक व व्याजीधंद्यांविषयी तक्रारी केल्या आहेत. खरे तर बेळगाव शहर व तालुका पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात येतो. मात्र जिल्हा पोलीसप्रमुखांनी फोन ईन कार्यक्रम सुरू केल्यापासून बेळगाव शहरातूनही समस्या मांडण्यात येत आहेत. या समस्या ते शहर पोलिसांच्या निदर्शनास आणून देत आहेत.









