नामांतरावर केंद्राची मोहोर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
नवी दिल्ली :
महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या नामांतराला केंद्र सराकरने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता यापुढे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत दिली आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या नावानी राज्यात मागील काही वर्षांपासून राजकारण सुरू आहे. नव्वदीच्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला संभाजीनगर असे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून कायमच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर म्हणून केला जातो. तर, उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा केला जातो. हिंदुत्ववादी संघटनांनीदेखील नामांतराची मागणी केली जात होती. मुघल साम्राज्याचा बादशाह औरंगाबाद याने छत्रपती संभाजी राजे यांची हत्या केली. त्यामुळे त्याच्या नावाचे शहर नको. अशी मागणी घेऊन औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु अखेर या नामातरांच्या विषयाला अखेर पूर्ण विराम मिळाला आहे.
करुन दाखविले : उपमुख्यमंत्री फडणवीस
या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले‘, असेही फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.
नामांतराचा प्रवास :
1988 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेत संभाजीनगर नामकरणाचा नारा दिला.
1995 जूनमध्ये औरंगाबादचे ‘संभाजीनगर‘ नामांतर करण्याचा ठराव मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविला.
1995 राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार असल्यामुळे नामकरणाची अधिसूचना काढली.
1996 मध्ये मुश्ताक अहेमद यांनी औरंगाबादच्या नामकरणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
1999 मध्ये राज्यात सत्तांतर होऊन युतीचे सरकार गेले. त्यामुळे नामकरणाचा प्रस्ताव पुढे सरकला नाही.
2002 मध्ये मुश्ताक अहेमद यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका निकाली निघाली.
2020 मार्चमध्ये औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणबाबतची न्यायालय याचिका, एनओसीबाबत शासनाने प्रशासनाकडून माहिती मागविली.
2021 मध्ये ‘सुपर संभाजीनगर‘ असा नारा देत शहरात डिस्पले लागले. त्यातच पालकमंत्र्यांच्या सरकारी दौऱ्यात संभाजीनगर छापून आल्याने वादाला तोंड फुटले.









