वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशामध्ये नव्याने विभागीय पद्धतीच्या स्वरुपात हॉकी स्पर्धा भरविण्याची योजना हॉकी इंडियाने आखली आहे. सदर विभागीय हॉकी स्पर्धा 17 आणि 19 वर्षाखालील वयोगटासाठी सुरू करण्याचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी दिली आहे.
हॉकी इंडियाला माजी ऑलिम्पिक अनुभवी हॉकीपटू दिलीप तिर्की हे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. त्यांना सुमारे 400 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. भारतीय हॉकी संघाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. देशामध्ये विविध वयोगटासाठी राष्ट्रीय स्पर्धा भरविल्या जातात. आता नवोदित होतकरू हॉकीपटूंना संधी मिळावी याकरिता विभागीय पद्धतेवर स्पर्धा घेण्याचा विचार हॉकी इंडिया करीत आहे. 17 वर्षाखालील उपकनि÷ आणि 19 वर्षाखालील कनि÷ गटातील हॉकीपटूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी पुरेशी संधी उपलब्ध होत नसल्याचे निरीक्षणाअखेर दिसून आले आहे.
विभागीय स्तरावर हॉकी स्पर्धा घेण्यासाठी आता विविध ठिकाणी प्रशिक्षण शिबिर कार्यक्रम घ्यावा लागेल. या शिबिरांमध्ये नवोदितांना माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटूंचे मार्गदर्शन मिळेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय हॉकीचा दर्जा सुधारण्याकरिता हॉकी इंडियाचे विविध प्रयत्न सुरू असून आगामी राष्ट्रीय हॉकी स्पर्धा ओदिशामध्ये एप्रिल महिन्यात होणार आहे. प्रकाशझोतामध्ये सामने खेळविण्याचा विचारही हॉकी इंडिया करीत आहे, असेही तिर्की यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.









