वृत्तसंस्था/ कोलंबो
2022 च्या क्रिकेट हंगामामध्ये लंकन क्रिकेट मंडळाला 630 कोटी रुपयांचा नफा झाला असून लंकन मंडळाच्या वार्षिक आर्थिक मिळकतीचा हा एक राष्ट्रीय विक्रमच म्हणावा लागेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट, राष्ट्रीय क्रिकेट, पुरस्कृत कंत्राटपद्धती क्रिकेट आणि आयसीसीच्या वार्षिक सदस्य मिळकत अशा चार विभागातून लंकन क्रिकेट मंडळाला हा आर्थिक नफा झाल्याची माहिती या मंडळाच्या प्रवक्त्याने दिली आहे. लंकेचे क्रीडामंत्री रोशन रणसिंगे यांनी लंकन क्रिकेट मंडळाची नवी घटना तयार करण्यासाठी दहा सदस्यांची समिती नियुक्त केली आहे. या समितीचे नेतृत्व सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. टी. चित्रासरी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या समितीमध्ये लंकेचे माजी क्रिकेटपटू सी. सेनानायके, एफ. महारुफ, रणसिंगे त्याचप्रमाणे काही कायदातज्ञांचा समावेश आहे. आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत लंकन मंडळाची नवी घटना तयार केली जाईल.









