नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत पुन्हा प्रचंड गोंधळ झाला आहे. या समितीत 6 सदस्य असतात. त्यांची निवड नगरसेवकांकडून केली जाते. या निवडणुकीत मतगणना होत असताना एक मत अवैध ठरविण्यात आले होते. त्यामुळे भाजपचे तक्रार केली. त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने भाजप सदस्यांनी घोषणा देण्यास प्रारंभ केला. काही सदस्य मतगणना टेबलवर चढले. त्यामुळे काहीकाळ मतगणना थांबविण्यात आली.
आम आदमी पक्षाकडून मतांची पुनर्मोजणी करण्याची मागणी करण्यात आली. या गडबडीत दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी एकमेकांशी मारामारी केली. एकमेकांवर बुक्क्यांचा वर्षाव करण्यात आला. या मारहाणीत काही नगरसेवक जखमी झाले. दिल्लीच्या महापौर शेली ओबेराय यांनी अवैध वगळून मतगणनेचा परिणाम घोषित केला जाईल, अशी घोषणा केली आहे. भाजपने मतांची पुनर्गणना करण्यास विरोध केला आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे चार तर भाजपचे दोन सदस्य निवडून येण्याची शक्यता आहे. दोन महिने उशीराने ही निवडणूक होत आहे. गुरुवारी आम आदमी पक्षाच्या एका नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. हा सदस्यही भाजपच्या वतीने स्थायी समितीच्या निवडणुकीत उमदेवार आहे.
जय श्रीरामच्या घोषणा एक मत अवैध ठरविण्यात आल्याने संतप्त झालेल्या भाजपच्या सदस्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषाणांनी सभागृह दणाणून सोडले होते. अनेक भाजप सदस्यांनी महापौरांना उद्देशून टीकात्मक टिप्पणीही केली. आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी केजरीवाल झिंदाबाद अशा घोषणा दिल्या. रात्री उशीरापर्यंत स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीचा परिणाम घोषित करण्यात आला नव्हता.









