केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताने कोरोना उद्रेकाच्या काळात सर्वंकष कोरोना विरोधी अभियान हाती घेतल्याने किमान 34 लाख लोकांचे प्राण वाचले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी केले आहे. केंद्र सरकारने कोणतीही हयगय न करता, ‘संपूर्ण सरकार, संपूर्ण समाज’ हे अभियान दोन वर्षांहून अधिका काळ चालविले. हे अभियान सक्रीय, सावध आणि परिणामपूर्व अशा स्वरुपाचे होते. केंद्र सरकारने सर्वंकष प्रतिसाद धोरण अवलंबिल्याने ते परिणामकारक ठरले, अशी भलावण त्यांनी केली.
मांडविया यांनी शुक्रवारी येथे स्टॅनफर्ड विद्यापीठ आणि इन्स्टिटय़ूट ऑफ काँपिटिटीव्हनेस यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माण करण्यात आलेल्या एका प्रबंधाचे प्रकाशन केले. ‘अर्थव्यवस्थेची प्रगती ः लसीकरणाचा आर्थिक परिणाम आणि संबंधित उपाययोजना’ असा या प्रबंधाचा मथळा आहे. डॉ. अमित कपूर तसेच डॉ. रिचर्ड डॅशर यांनीं हा प्रबंध लिहिला आहे. कपूर हे स्टनफर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तर डॅशर हे याच विद्यापीठातील अमेरिका-आशिया तंत्रज्ञान व्यवस्थापन केंद्राचे संचालक आहेत. कोरोना उद्रेकाच्या काळात भारत सरकारने केलेल्या उपाययोजना या विषयावर विस्तृत भाष्य केलेले आहे. भारताने वेळीच आणि प्रभावी पद्धतीने केलेल्या उपाययोजनांमुळे किमान 34 लाख लोकांचे प्राण वाचले, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष या प्रबंधामध्ये काढण्यात आला आहे.
लसीकरणाचा सकारात्मक परिणाम
कोरोना उद्रsकाच्या काळात भारताने मोठय़ा प्रमाणात लसीकरण कार्यक्रम हाती घेतला. 200 कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या. याचा परिणाम म्हणून कोरोनावर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवण्यात भारत यशस्वी ठरला. याचा अर्थव्यवस्थेवरही सुपरिणाम दिसून आला. वेळीच अशा उपाययोजना केल्या नसत्या तर भारताच्या अर्थव्यवस्थेची कोंडी झाली असती. तसेच मोठय़ा प्रमाणात आर्थिक हानी झाली असती. भारताच्या सक्रीय अभियानामुळे अर्थव्यवस्थेची 18.3 अब्ज डॉलर्सची संभाव्य हानी टाळली गेली. तसेच भारताच्या अर्थव्यवस्थेचा एकंदर 15.42 अब्ज डॉलर्सचा अर्थव्यवस्थेचा नफा झाला आहे. लसीकरणाचा खर्च वगळता झालेला हा लाभ कौतुकास्पद आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला.
आरोग्य सुविधांमध्ये वाढ
कोरोना उद्रेकाच्या काळात भारताच्या आरोग्य सुविधांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ करण्यात आली. कोरोना रुग्णांसाठी बेड्स, औषधे, इतर साहाय्यता, मास्कस्, पीपीई कीट्स आणि वैद्यकीय ऑक्सिजन यांची सुविधा योग्य प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आली होती. याशिवाय कोरोना रुग्णांना हाताळणाऱया आणि लसीकरण करणाऱया कर्मचारीवर्गाचे कौशल्य संवर्धन, डॉक्टरांचे प्रशिक्षण आदी कार्यक्रम याचवेळी हाती घेण्यात आले होते. यासाठी विशेष कौशल्यसंवर्धन केंद्रे आणि प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात आली होती. लसीकरणामुळे वाचलेल्या लोकांनी अर्थव्यवस्थेत 21.5 अब्ज डॉलर्सचे योगदान केले. लसीकरणामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर कोरोना उद्रेकामुळे पडलेला अतिरिक्त ताण मोठय़ा प्रमाणात वाचला. भारताची लसनिर्मिती क्षमता वाढली, असे प्रबंधात नमूद आहे.
खर्चात वाढीमुळे लाभ
कोरोना उद्रेकाच्या काळात केंद्र सरकारने खर्चात मोठी वाढ केली. याकाळात सामाजिक योजना, विनामूल्य धान्य योजना आदी प्रकल्पांच्या माध्यमातून 280 अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आले. याचा अर्थव्यवस्थेला लाभ झाला. असा महत्वपूर्ण निष्कर्षही या प्रबंधात काढण्यात आहे, अशी माहिती देण्यात आली.









