देशातील तब्बल 311 नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असल्याचा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल म्हणजे देश व देशवासियांसाठीचा गर्भित इशाराच मानावा लागेल. मंडळाच्या जल गुणवत्ता व्यवस्थापन विभागाकडून ‘पोल्युटेड रिव्हर स्ट्रेचेस फॉर रिस्टोरेशन ऑफ वॉटर क्वालिटी’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेला हा अहवाल अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरतो. याअंतर्गत देशातील 603 नद्यांचे विश्लेषण करण्यात आले. यापैकी 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 279 नद्यांतील 311 नदीपट्टे प्रदुषित असणे आणि त्यात महाराष्ट्रासारखे विकसित व औद्योगिकदृष्टय़ा पुढारलेले राज्य अग्रस्थानी असणे, ही काही भूषणावह बाब ठरू नये. महाराष्ट्रातील अशा प्रदुषित पट्टय़ांची संख्या तब्बल 55 इतकी असून, अगदी यात निम्म्याच्या जवळपासही कुठले राज्य दिसत नाही. महाराष्ट्र किती गंभीर वळणावर आहे, याचेच हे निदर्शक. देशातील इतर राज्यांचा विचार करता मध्य प्रदेशातील 19, बिहार आणि केरळमधील 18, तर कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील 17 नदी पट्टे प्रदुषित आढळतात. हे पाहता या सर्वच राज्यांमध्ये नदी शुद्धीकरणाकरिता अधिक काम करावे लागेल. प्रगत राज्य ही महाराष्ट्राची ओळख. मुंबई ही तर देशाची आर्थिक राजधानी. त्यामुळे देशभरातील नागरिकांचा या महानगरीकडे ओढा. दाटीवाटीच्या शहरांमध्ये मुंबईचा जगात पाचवा क्रमांक लागतो. वाढत्या लोकसंख्येचा ताण हा शहरावर, तेथील सांडपाणी व्यवस्थेवर येणे ओघाने आलेच. या सांडपाण्यामुळे मुंबईतील नैसर्गिक प्रवाहांची अवस्था गटारांसारखी झालेली पहायला मिळते. मिठी नदी हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण. या नदीचाही प्रदुषित म्हणून या अहवालात समावेश आहे. मिठी नावाची कुठली नदी या मेट्रो सिटीतून वाहते, हे 2005 पूर्वी कुणाच्या गावीही नसावे. मात्र, 26 जुलैच्या प्रलयंकारी पुराने मिठीने आपल्या अस्तित्वाची जाणीव मुंबईकरांना करून दिली. त्यानंतर मिठी शुद्धीकरणावर बरीच चर्चा, घोषणा झाल्या. परंतु, अजूनही सांडपाणी, मैला पाणी, कचरा व रसायनयुक्त पाण्याच्या दुष्टचक्रातून या नदीची सुटका होऊ शकलेली नाही. पुणे ही उद्योगनगरी व आयटी सीटी म्हणून प्रसिद्ध आहे. वास्तविक पुणे जिल्हय़ास नद्यांचे वरदान लाभलेले. चांगला पाऊस व दुथडी भरून वाहणाऱया नद्यांमुळे पाण्याची मुबलक उपलब्धता. या नद्यांच्या पुण्याईमुळेच उजनीद्वारे सोलापूरला पाणी मिळते. तथापि, येथील मुळा, मुठा, इंद्रायणी, पवना या नद्यांची अवस्था अत्यंत दयनीय अशी. पुण्याच्या मध्यवस्तीत तर नदी म्हणून मुठेचे अस्तित्वच संपुष्टात आले असून, सांडपाणी व मैलापाण्याने एखाद्या गटारासारखी तिची अवस्था झाली आहे. मुळा, पवनाही औद्योगिक मिश्रित पाण्यामुळे पुरत्या काळवंडलेल्या पहायला मिळतात. पवित्र इंद्रायणीच्या पाण्याची आळंदी परिसरातील दुर्गंधी तिच्या आरोग्याबाबत बरेच काही सांगते. भीमाशंकरमधून उगम पावत पुढे विस्तारत गेलेली भीमा नगरांच्या-शहरांच्या संपर्कात आल्यावर बदलत गेलेली. पंढरपुरात चंद्रभागा म्हणून ओळखल्या जाणाऱया या नदीला भागवत धर्मात मोठे स्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक पंढरीत हजेरी लावतात, चंद्रभागेत डुबकी मारतात. परंतु, या नदीची अवस्था पाहिली, की वेदना होतात. पंढरपुरातील सांडपाण्याने, शेवाळमिश्रित पाण्याने चंद्रभागेचे नदीपणच हरवलेले आहे. ‘नमामि चंद्रभागा’ या प्रकल्पाचा मोठा गाजावाजा झाला असला, तरी अद्याप या पातळीवर विशेष काहीच झालेले नाही. त्र्यंबकेश्वरातून उगम पावत नाशिक, नगर, औरंगाबाद असा प्रवास करीत पुढे जाणारी गोदावरीही प्रदुषणाच्या विळख्यात सापडलेली. कचरा, प्लॅस्टिकने या महाकाय नदीचा पोतच बिघडलेला पहायला मिळतो. प. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या म्हणजे कृष्णा, कोयना. कोयना ही कृष्णेचीच उपनदी. पंचगंगेसह अनेक नद्या तिला मिळत असल्या, तरी उपनद्याच प्रदुषित असल्याने त्यांना पोटात घेऊनच कृष्णा पुढे जाते. ऊस पट्टय़ातील साखर कारखाने तसेच औद्योगिक कारखान्यांचे रसायनमिश्रित पाणी, इचलकरंजीसारख्या कापडउद्योगांतून मिसळणारे प्रक्रियायुक्त पाणी तसेच काठावरील छोटय़ा-मोठय़ा गावांना आलेले नगरांचे स्वरूप यातून येणाऱया सांडपाण्यामुळे संथ, सात्विक कृष्णा भेसूर होऊन जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दंड ठोठावायचा, पालिकांनी तो भरायचा, याच्या पुढे गाडी जाणार नसेल, तर काय? अनेक महापालिकांच्या माध्यमातून वेगवेगळय़ा शहरांमध्ये नदी शुद्धीप्रकरण राबविण्यात येते. पण, ते किती सक्षमपणे चालविले जातात, हा प्रश्न आहे. काही प्रकल्प तर बंद पडलेलेही दिसतात. जी अवस्था महाराष्ट्रातील नद्यांची, तीच दिल्लीतील यमुना, यूपीसह अन्य राज्यांतून वाहणारी गंगा, एमपीतील क्षिप्रा, चंबळ, कर्नाटकातील तुंगभद्रा आदी नद्यांची. गुजरातमधील साबरमती तर देशातील दुसऱया क्रमांकाची प्रदुषित नदी मानली जाते. एकेकाळी नद्यांच्या काठाला धरूनच वेगवेगळय़ा संस्कृती उद्गम पावल्या, विकसित झाल्या. तथापि, पूर्वसुरींचा नदी, तिच्या पर्यावरणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन जितका स्वच्छ होता, तसा तो आता दिसून येत नाही. म्हणूनच दिवसेंदिवस नद्यांचे पर्यावरण बिघडत असून, तेथील जैवविविधता धोक्यात आली आहे. जलपर्णी वाढणे, हे तर ऑक्सिजन संपल्याचे गमक. आज अनेक नद्या या जलपर्णीच्या सापळय़ात अडकलेल्या आढळतात. माशांच्या वा अन्य जलचरांच्या अनेक प्रजाती संपतात, तर चिलापीसारखे प्रदुषित पाण्यात फोफावणारे मासे वाढतात, ही आजची परिस्थती आहे. याशिवाय दुषित पाण्यामुळे काविळ, गॅस्ट्रो यांच्यासारख्या आजारांचे वाढते प्रमाणही चिंताजनक होय. एकूणच नदीजीवन विस्कळित झाल्याने सगळय़ाच परिसंस्था धोक्यात आल्या असून, पर्यावरण, निसर्ग, जैवविविधता, मानवी आरोग्यावर होणारे हे गंभीर परिणाम परवडणारे नाहीत. म्हणूनच ही धोक्याची घंटा समजून सरकारने या मुद्दय़ावर गांभीर्याने पावले उचलायला हवीत. एकेकाळी अत्यंत प्रदुषित म्हणून मानली जाणारी युरोपातील ऱहाईन नदी आज जगातील सर्वांत शुद्ध नदी मानण्यात येते. तिचा हा कायापालट कसा झाला, हे समजून घेतानाच नदी शुद्धीकरणासाठी ठोस भूमिका घ्यायला हवी. दुषित पाण्यापासून नद्यांचे संरक्षण केले, तर त्या नक्कीच मुक्तपणे, स्वच्छंदीपणाने वाहू शकतील.
Previous Articleविभागीय हॉकी स्पर्धेचा हॉकी इंडियाकडून विचार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








