जगप्रसिद्ध अभिनेता रसेल क्रोचा चित्रपट
हॉलिवूड चित्रपटात चर्च आणि सैतानी शक्तींमधील लढाईची कहाणी अनेकदा पडद्यावर दाखविली जाते. एक्झोरसिजम म्हणजेच भूत पळवून लावण्यासाठी केल्या जाणाऱया तंत्रविद्येला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेल्या द एक्झोरसिस्ट आणि द कॉन्ज्युरिंग सीरिजच्या चित्रपटांना मोठी पसंती मिळत असते.
सुपरनॅचरल थ्रिलर आणि हॉरर धाटणीच्या चित्रपटांची जगभरात मोठी फॅन फॉलोइंग आहे. भारतातही अशा प्रकारचे चित्रपट पसंत करणाऱयांची संख्या कमी नाही. अशाच शौकिनांसाठी आता हॉलिवूडमधून आणखी एक चित्रपट येत आहे.

या चित्रपटाचे नाव द पोप्स एक्झोरसिस्ट’ असून तो 7 एप्रिल रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळी, कन्नड आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्युलियस एव्हरी यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटात रसेल क्रो हा फादर गॅब्रिएल यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाची कहाणी मायकल पेट्रोनी आणि एवान स्पिलियोटोपलस यांनी लिहिली आहे. रसेल क्रो समवेत डॅनियल जोवाटो, ऍलेक्स एसो आणि प्रँको नीरो या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत.
7 एप्रिल रोजी गुमराह या हिंदी चित्रपटाशी द पोप्स एक्झोरसिस्टला स्पर्धा करावी लागणार आहे. गुमराह या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट तमिळ चित्रपट थडमचा हिंदी रिमेक आहे.









