वैज्ञानिकांसाठी ठरला रहस्य
चीनमध्ये 19 वर्षीय एका युवकाला वयाच्या 17 व्या वर्षापासून विस्मृतीची समस्या होती. यासंबंधी वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यावर डिमेंशिया आजार असल्याचे दिसून आले आहे. जर्नल ऑफ अल्झायमर्स डिसिजमध्ये प्रकाशित एका केस स्टडीतून ही माहिती मिळाली आहे. अनेक प्रकारच्या परीक्षणांनंतर बीजिंगमध्ये कॅपिटल मेडिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी किशोरवयीनामधील ‘संभाव्य’ अल्झायमर रोगाचे निदान केले आहे. हे निदान अचूक असल्यास तो सर्वात कमी वयाचा अल्झायमरचा रुग्ण ठरणार आहे. अल्झायमरचे अचूक कारण अद्याप बऱयाचअंशी अज्ञात आहे.

संबंधित रुग्णाप्रकरणी ज्ञात आनुवांशिक परिवर्तन शोधण्यास संशोधकांना अपयश आले आहे. तसेच किशोरवयीनाच्या कुटुंबात कुणालाही अल्झायमर रोगाची पार्श्वभूमी राहिलेली नाही. या युवकाला अन्य कुठलाच आजार, संक्रमण किंवा मेंदूला आघात झाला नव्हता. तसेच या युवकाला अल्झायमरच्या ज्या प्रकारची समस्या आहे ती अत्यंत दुर्लभ आहे.
या युवकाला वयाच्या 17 व्या वर्षी स्वतःच्या शालेय शिक्षणावर लक्ष केंद्रीत करणे अवघड ठरू लागले होते. त्यानंतर एक वर्षाने अल्पकालीन स्मृतीला नुकसान पोहोचू लागले होते. आपण काय खाले आणि होमवर्क केला आहे की नाही हेच त्याला आठवत नव्हते. स्मरणशक्ती हरवू लागल्याने त्याला शाळा सोडून द्यावी लागली. त्याची स्मृती गंभीर स्वरुपात क्षीण होती असे तपासण्यांमध्ये दिसून आली होती. मागील काही काळात कमी वयाच्या लोकांमध्ये अल्झायमरची समस्या वाढत आहे.









