प्रतिनिधी,कोल्हापूर
राज्याच्या पुरातत्व विभागाने राजगडावर राहण्याला बंदी करणारे पत्रक काढले आहे. एकीकडे विशाळगडावर अतिक्रमण हटवण्यास दिरंगाई होत असताना राजगडावरील निवासाला मनाईच्या आदेशाने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यातूनच कोल्हापुरातील शिवदुर्ग संवर्धन आंदोलन संस्थेने यासंदर्भात गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संबंधित आदेश मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन पाठवले. तसेच राज्य पुरातत्व विभागाच्या या कृतीचाही निषेध केला आहे.
शिवदुर्ग समितीने मुख्यमंत्री शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात ‘राज्य पुरातत्व खात्याने बुधवारी राजगडासंदर्भात पत्रक काढले. यामध्ये राजगडावर राहण्यास बंदी केली आहे, राजगडाचे इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे, या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुमारे 25 वर्षे वास्तव्य होते. राजगड हा मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला आहे. तरीही पुरातत्व विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी गडाच्या संवर्धनाकडे लक्ष न देता चुकीची कारणे देत राजगडावर राहण्यास बंदी घातली आहे.
राज्य पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजगड एकदा पायी फिरून बघावा, एका दिवसात तो पाहून झाल्यास लाखाचे बक्षीस देऊ, राजगडावरच नव्हे तर राज्यातील कोणत्याही किल्ल्यावर राहण्यास बंदी असू नये. तसेच असला खोडसाळपणा किल्ल्यांबाबत खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे.
विशाळगडावर राजरोसपणे अवैध धंदे सुरू असताना, अतिक्रमणाचा विळखा असताना पुरातत्व अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलेले आहे, फक्त नोटीस देण्याचेच काम या खात्याचे केल्याचा आरोप केला आहे. किल्ले संवर्धन करा, किल्ल्यावरील वास्तूंची डागडुजी करा, पुनर्बांधणी करा, अशी मागणी केली आहे. तसेच राजगडावरील बंदीबाबत शिवप्रेमींमध्ये प्रचंड आक्रोश आहे, राज्य पुरातत्व खात्याने हा आदेश ताबडतोब मागे घ्यावा अन्यथा पुरातत्व विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर शिवदुर्ग संवर्धन आंदोलनचे हर्षल सुर्वे, इंद्रजीत सावंत, राम यादव, अमित अडसूळ, प्रदीप हांडे, प्रज्वल गोडसे, संकेत खोत, देवेंद्र सावंत, कृष्णात जगताप, यश मंडलिक आदींच्या सह्या आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









