लांजा तालुक्यातील येरवंडे, तळवडे, कणगवली येथील घटना
लांजा प्रतिनिधी
सोमवारी दुपारी लागलेल्या वणव्यामुळे तालुक्यातील येरवंडे, तळवडे, कणगवली आदी गावातील आंबा आणि काजूच्या बागा जळून भस्मसात झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून लांजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटना घडत आहेत. सतत घडणाऱ्या वणव्यांच्या घटनांमुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
सोमवार २० फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान अचानक लागलेल्या वणव्यामुळे आंबा आणि काजूच्या बागा भस्मसात झाल्या असून त्यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत जळून खाक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडू लागला आहे. त्यामुळे नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
येरवंडे, तळवडे आणि कणगवली या भागात लागलेल्या वणव्यामुळे आंबा व काजू बागा होरपळून गेल्या असून सध्या आंबा आणि काजू बागांना मोठ्या प्रमाणात फळधारणा होत आहे. अशा परिस्थितीत लागलेल्या वणव्यामुळे शेतकऱ्यांसमोर काय करावे? असा मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला असून संबंधित प्रशासन यामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी व तलाठी यांनी तातडीने याबाबतचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.