विद्यापीठाचे कुलगुरु विद्याशंकर यांची माहिती : राज्यपालांची राहणार उपस्थिती
बेळगाव : विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 22 वा पदवीदान सोहळा शुक्रवार दि. 24 रोजी होणार आहे. सकाळी 11.30 वाजता व्हीटीयुच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात कार्यक्रम होणार आहे. पदवीदान समारंभात तिघांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरविले जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. विद्याशंकर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली पदवीदान समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला दिल्ली येथील ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचे प्रा. टी. जी. सीतारामन व उच्चशिक्षण मंत्री सी. एन. अश्वत्थनारायण उपस्थित राहणार आहेत. या पदवीदान समारंभामध्ये 707 विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी दिली जाणार आहे. गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने सन्मानीत केले जाणार आहे.
तिघांना मानद डॉक्टरेट
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही विद्यापीठातर्फे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानीत करण्यात येते. व्याबको इंडिया लि. चे चेअरमन एम. लक्ष्मीनारायण व बेळगावचे उद्योजक सचिन सबनीस यांना मानद डॉक्टरेट दिली जाणार आहे. टोयाटो-किर्लोस्कर मोटर्सचे व्हा. चेअरपर्सन कै. विक्रम किर्लोस्कर यांना मरणोत्तर डॉक्टरेट दिली जाणार आहे. यंदा 51 हजार 905 विद्यार्थ्यांना बीई-बीटेक, 9 जणांना बी प्लॅन, 1032 जणांना बी आर्क, 4279 जणांना एमबीए, 2028 जणांना एमसीए, 82 जणांना एम. आर. व एका विद्यार्थ्याला पदव्युत्तर पदवी दिली जाणार आहे. बेंगळूर येथील मुरली या सिव्हिल इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याने एकूण 18 सुवर्ण पदकांवर आपली मोहोर उमटवली आहे. यावर्षी पहिले दहा सुवर्णपदक विजेते बेंगळूर येथीलच आहेत. विद्यापीठाचा दर्जा वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांशी समन्वय करार करण्यात आला आहे. त्याचबरोबर माहितीचे आदानप्रदान होण्यासाठी अनेक कार्यशाळा घेतल्या जात असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. यावेळी विद्यापीठाचे रजिस्ट्रार प्रा. बी. ई. रंगास्वामी, प्रा. टी. एन. श्रीनिवास उपस्थित होते. पदवीदान सोहळ्यास उपस्थित राहणारे विद्यार्थी, प्राचार्य आणि पालक यांच्यासाठी शुक्रवार दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8.30 वाजेपर्यंत मध्यवर्ती बसस्थानकापासून (सीबीटी) विद्यापीठापर्यंत वाहतुकीची सोय करण्यात आली आहे, असे कळविण्यात आले आहे.









