चित्रकार विकास पाटणेकर यांना सन्मान : बेळगावकरांसाठी अभिमानास्पद
बेळगाव : बेळगाव ही कलाकारांची खाण असून येथील कलाकारांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात आहे. साहित्य, संगीत, चित्रकला, नृत्य यासह विविध कलांमध्ये बेळगावचे कलाकार आपली मोहोर उमटवित असून बेळगावचे सुपूत्र असणारे चित्रकार विकास पाटणेकर यांना अयोध्येत उभारल्या जात असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये चित्रे रेखाटण्याची संधी मिळाली आहे. बेळगावच्या चित्रकाराला हा मान लाभणे ही बेळगावकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. य् ाा बाबतचे सविस्तर वृत्त असे की, खुद्द विकास पाटणेकर यांना याबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. मात्र ‘टुरिझम इंडिया’ आणि पंतप्रधान कार्यालयाच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या ‘इनक्रेडिबल इंडिया’ यांच्यातर्फे तेथील अधिकाऱ्यांनी विकास यांच्याशी संपर्क साधला. तत्पूर्वी त्यांच्याबद्दलची सर्व माहिती अधिकाऱ्यांनी संकलित केली होती. त्यांच्या चित्राकृतीही पाहिल्या होत्या.
संबंधित अधिकाऱ्यांनी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिरातील चित्राकृतींचे रेखाटन तुम्ही करावयाचे आहे, असे फोनद्वारे त्यांना कळविले. हा विकास यांच्यासाठी सुखद धक्का होता. या महत्त्वाच्या कामासाठी आपली निवड होणे हा एक सन्मानच आहे, असे समजून विकास पाटणेकर लखनौला गेले व तेथून अयोध्येला जाऊन त्यांनी पूर्ण माहिती घेतली. मुळातच रामायणामध्ये वेगवेगळे अनेक प्रसंग आहेत. परंतु त्यातही काही ठळक प्रसंग अद्यापही लोकांना माहीत नाहीत, असे काही प्रसंग या चित्रांतून त्यांना साकारावयाचे आहेत. एकूण 70 चित्रांच्या माध्यमातून त्यांना रामायण दृष्यस्वरुपात उभे करावयाचे आहे. ही चित्रे 30 बाय 22 इंच आणि त्यावर फ्रेमिंग 3 बाय 4 फूट अशी असणार आहे. मुख्य म्हणजे डिसेंबरपूर्वी हे काम पूर्ण करावयाचे आहे. एप्रिलपासून या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी निवड होणे आणि आपल्याला चित्रे रेखाटण्याची संधी मिळणे, याचा आनंद शब्दातीत आहे, असे विकास पाटणेकर म्हणाले.









