पुणे / वार्ताहर :
मेफेड्रोन या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या मुंबईच्या दलालास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून 4 लाख रुपये किंमतीचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. असिफ अली अलिमुद्दिन शेख (वय 36, रा. हलावपुल, कुर्ला वेस्ट, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरूद्ध चतुशृंगी पोलीस ठाण्यात एनडीपीसी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक दोनकडून शहरात पेट्रोलिंग करण्यात येत होते. त्यावेळी मुंबईहून एकजण मेफेड्रॉनची विक्री करण्यासाठी बाणेर परिसरात आल्याची माहिती पोलीस नाईक साहिल शेख आणि शिपाई अझीम शेख यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने बाणेर परिसरात सापळा रचून मोटारीतून आलेल्या संशयास्पद चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपासणी केली असता, 4 लाखांचे 20 ग्रॅम मेफेड्रॉन हा अमली पदार्थ आढळून आला. चौकशीत त्याने मुंबईहून मेफेड्रॉन विक्रीसाठी पुण्यात आल्याची कबुली दिली. आरोपीकडून मेफेड्रॉनसह तीन मोबाईल, स्विफ्ट कार, काही रोकड असा एकूण 8 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.









