-सीईओ संजयसिंह चव्हाण यांची माहिती
-शिवजयंतीच्या औचित्यावर होणार भूमीपूजन
-आमदार, खासदार, सरपंचांसह स्थानिक लोकप्रतिनिधी राहणार उपस्थित
प्रतिनिधी,कोल्हापूर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजना अंतर्गत कमी उत्पन्न गटातील दुर्बल घटकांसाठी असणाऱ्या घरकुल योजने अंतर्गत जिह्यातील 1551 घरकुलांचे भूमीपूजन केले जाणार असल्याची माहिती सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे, घरकुलांचा बांधकाम शुभारंभ कार्यक्रम विविध लोकप्रतिनिधी, सरपंच ते आमदार, खासदार यांच्या शुभहस्ते व विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यासाठी पालक अधिकारी नियुक्त केले आहेत.
शिवजयंती दिनी घरकुलाचा शुभारंभ करा
रयतेचा जाणता राजा शिवाजी महाराजांचा शिवजयंती दिन हा सर्वात शुभदिन आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपल्या घरकुलाच्या बांधकामाचा शुभारंभ करावा. सर्व लोकप्रतिनिधींनी या मंगल प्रसंगी उपस्थित राहून खऱ्या अर्थाने आपल्या जाणत्या राजांची जयंती साजरी करून त्यांना मानवंदना अर्पण करावी.
संजयसिंह चव्हाण, सीईओ, जिल्हा परिषद कोल्हापूर









