प्रतिनिधी/ डिचोली
गोमंतकातील तीर्थक्षेत्र म्हणून गणल्या जाणाऱ्या हरवळे सांखळी येथील श्री रूद्रेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. भाविकांबरोबरच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वहस्ते शिवलिंगावर दुग्धाभिषेक केला.
हरवळेतील श्री रूद्रेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त आदल्या दिवसापासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरूवात झाली होती. पहाटे 5 वाजता देवस्थान समितीचे अध्यक्ष यशवंत माडकर यांच्या हस्ते प्रथम रूद्रेश्वर लिंगावर अभिषेक झाला. त्यानंतर भाविकांना अभिषेकची संधी दिली. या संधीचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सकाळी 8 वा. मंदिरात भेट देऊन स्वहस्ते लिंगावर दुग्धाभिषेक केला. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष यशवंत माडकर, पंचायत सदस्य संजय नाईक व इतर उपस्थित होते. प्रशासन व देवस्थान समिती यांच्या विद्यमाने भाविकांसाठी योग्य व्यवस्था केली होती. या मंदिराच्या परिसरात सरकारतर्फे सुशोभिकरण करण्यात येत आहे. लवकरच ते काम पूर्ण होईल, असे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांनी दिवसभर रांगा लावून श्रींचे दर्शन घेत अभिषेक केला. सायंकाळपर्यंत भाविकांची गर्दी दिसून येत होती.









