वार्ताहर/ कुद्रेमनी
‘हर हर महादेव’च्या जयघोषात देवरवाडी येथील श्री क्षेत्र वैजनाथ देवस्थान मंदिरात महाशिवरात्रौत्सव साजरा करण्यात आला.
शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर दूध, बेलपत्र, फुले वाहून अभिषेकाचा परंपरागत विधी झाला. मंदिरातील पुरोहितांनी मंत्रोच्चाराचा गजर केला. घंटांच्या निनादाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
नूतन स्थानिक सल्लागार उपसमिती कार्यकारिणी मंडळींच्या उपस्थितीत अभिषेक व आरती कार्यक्रम झाला. यानंतर अनेक भाविकांनी वैयक्तिकरीत्या अभिषेक घातला. यावेळी स्थानिक उपसमितीचे अध्यक्ष गीतांजली सुतार, उपाध्यक्ष शंकर भोगण, सचिव विनोद मजुकर, शिवाजी भोगण, सदस्य परशराम आढाव, संजय भोगण, प्रमोद केसरकर, शिवकुमार पुजारी, उमेश भांदुर्गे, अमोल भोगण, जयवंत कांबळे, रामा कांबळे, नागेंद्र जाधव, संतोष पाटील, राजाराम करडे, ग्रा. पं. सदस्या मनीषा भोगण, प्रभावती मजुकर, मंजुळा कांबळे, उपसरपंच गोविंद आढाव व असंख्य भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते.
शनिवारी दिवसभर भाविकांनी देवदर्शन घेतले. यात्रोत्सव पार पाडण्यासाठी स्थानिक सल्लागार उपसमितीने विशेष परिश्रम घेतले. रविवारी दुपारी 12 वाजल्यानंतर महाप्रसादाने महाशिवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.









