विधानसभा निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांच्या बदल्या : मनपातील अधिकाऱ्यांच्या बदल्या नाहीत
प्रतिनिधी/ बेळगाव
विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जोरदार तयारी चालविली आहे. मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रे तयार ठेवणे, मतदारयाद्या तयार करणे आदी कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्थानिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेशदेखील प्रशासनाने बजावला आहे. मात्र महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या अद्याप झाल्या नाहीत. त्यामुळे मनपातील स्थानिक अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी होणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घोषणाबाजी केली जात आहे. त्याचप्रमाणे सभा, बैठकांचे आयोजन करून मतदारांना विविध पारितोषिकांची खैरात केली जात आहे. सध्या सर्वच वातावरण निवडणूकमय बनले आहे. निवडणुकीची घोषणा झाली नाही. मात्र शासनाची तयारी आणि इच्छुकांनी चालविलेली तयारी पाहता निवडणुका लागलीच होणार आहेत, असे चित्र पहावयास मिळत आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवासी असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या अन्य जिल्ह्यात करण्यात येत आहेत. याबाबतचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. टप्प्याटप्प्याने विविध खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र महापालिकेत कार्यरत स्थानिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत शासनाकडून कोणताच आदेश जारी करण्यात आला नाही.
दक्षिण मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी म्हणून महापालिका आयुक्तांकडे जबाबदारी असते. तर उत्तर मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या पदाची जबाबदारी कौन्सिल सेव्रेटरीकडे सोपविण्यात येते. महापालिकेत कौन्सिल सेव्रेटरीपद रिक्त असून या पदावर अधिकारी नसल्याने पदाचा कार्यभार सामान्य प्रशासन उपायुक्तांकडे सोपविण्यात आला आहे. सामान्य प्रशासन उपायुक्त जिल्ह्यातीलच असून त्यांच्याकडेच निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार हे योग्य आहे का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे मनपा सामान्य प्रशासन उपायुक्तांची बदली कधी होणार? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.









