परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचा हल्लाबोल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अमेरिकेतील अब्जाधींश जॉर्ज सोरोस हे म्हातारे, हट्टी आणि धोकादायक आहेत, अशी जहाल टीका भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केली आहे. सोरोस यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अदानी प्रकरणातच्या पार्श्वभूमींवर टिप्पणी केली होती. पंतप्रधान मोदी हे लोकशाही देशाचे नेते आहेत. मात्र, स्वतः लोकशाहीवादी नाहीत. ते मुस्लिमांच्या हत्या करुन मोठे नेते झाले आहेत. त्यांच्या या विकृत टिप्पणीमुळे देशात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
जयशंकर यांनी त्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱयात सोरोस यांच्या टिप्पणींला प्रत्युत्तर दिले आहे. जगात काही लोकांना आपल्या प्रभावासंबंधी मोठाच गैरसमज असतो. हे लोक आपण म्हणू तोच नेता एकाद्या देशाचा प्रमुख होईल अशा भ्रमात असतात. सोरोस हे त्यांच्यापैकी एक आहेत. भारत परिपूर्ण लोकतांत्रिक देश असून लोक आमच्या देशात मोठय़ा संख्येने आणि उत्साहात मतदान करतात. पण सोरोस हे भारताच्या संदर्भात अज्ञानी आहेत. ते ऐकीव कथांवर विश्वास ठेवून भारतासंबंधी बोलतात. भारताच्या लोकशाहीत चुका शोधण्याचा आगावूपणा करतात, असे खोचक प्रत्युत्तरही जयशंकर यांनी दिले होते.
सोरोस यांनी भारत आणि रशियाच्या संबंधांवरही आक्षेप घेतला होता. भारत हा क्वाडचा सदस्य आहे. या संघटनेत अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे देश आहेत. असे असूनही भारताचे रशियाशी संबंध आहेत. भारत रशियाकडून मोठय़ा प्रमाणात कच्चे इंधन तेल खरेदी करुन मोठा लाभ कमावत आहे, अशीही मुक्ताफळे त्यांनी उधळली आहेत. त्यांनी पूर्वी सीएए आणि घटनेचा अनुच्छेद 370 निष्प्रभ करण्याच्या भारताच्या निर्णयासंदर्भातही अनेक टिप्पणी केल्या आहेत.
सोरोस यांचे गांधी कनेक्शन
राहुल गांधी यांच्या पदयात्रेत सोरोस यांची माणसेही होती. ओपन सोसायटी फाऊंडेशन या एका बिगर सरकारी संस्थेचे लोक या पदयात्रेस समाविष्ट झाले होते. मात्र, ही संस्था सोरोस यांच्याशी संबंधित आहे. यातून राहुल गांधी आणि सोरोस यांच्यातील संबंध स्पष्ट होतात. काँगेसने कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी सत्य बाहेरच पडलेच आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.









