पाटणा / वृत्तसंस्था
माझा सल्ला काँगेसने ऐकला तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरात 100 जागाहीं मिळणार नाहीत, असे प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले आहे. मात्र जर काँगेसने आपला सल्ला मानला नाही, तर मात्र पुन्हा केंद्रात भाजपचेचे भगवे सरकार येईल, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मर्क्सिस्ट लेनिनिस्ट) पक्षाच्या 11 व्या महाअधिवेशनात ते बोलत होते. आम्ही वाट पहात आहोत. काँगेसने लवकर निर्णय घ्यावा. माझीं सूचना काँगेसने मानली आणि सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढविली तर भाजपला आपण 100 जागांमध्ये रोखू शकतो. काँगेसला आता पुढे येण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. काँगेसने विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात पुढाकार घेतला पाहिजे. कोणत्या राज्यात कोणत्या पक्षासोबत जाऊन निवडणूक लढवायची याचा निर्णय काँगेसने लवकर करावा. आम्ही या संदर्भात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना भेटलो होतो, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.
सलमान खुर्शिद यांना आवाहन
यावेळीं व्यासपीठावर काँगेसचे नेते सलमान खुर्शिद उपस्थित होते. त्यांना उद्देशून नितीश कुमार यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. भाजप भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्व धर्म आणि जाती यांना एकत्र करुन आम्हाला वाटचाल करावी लागणार आहे. देशाचा पंतप्रधान होण्याची माझी इच्छा नाही. आम्हाला केवळ परिवर्तन हवे आहे. त्यामुळे काँगेस आणि इतर विरोधी पक्ष एकत्र आल्यास देशात परिवर्तन निश्चित आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पण प्रथम बोलणार कोण ?
यावर सलमान खुर्शिद यांनी ‘पहले आय लव्ह यू’ कौन बोलेगा असा प्रश्न केला. आज देशात सर्वत्र गुजरात मॉडेलची चर्चा होत आहे. नितीश कुमार यांनी देशभर बिहार मॉडेलची चर्चा घडवून आणावी. बिहार मॉडेलमध्ये शांती आणि सद्भाव याला महत्व आहे. निवडणूक जवळ आल्यानंतरच हे ठरेल की, कोणत्या राज्यांमध्ये कोणता पक्ष कोणासह लढणार, अशी टिप्पणीही त्यांनी केली.









