इतिहासप्रसिद्ध महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी प्रचंड संख्येने भाविक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हिंदूंसाठी अत्यंत पवित्र असणारे महाशिवरात्री पर्व देशभरात मोठय़ा उत्साहात साजरे करण्यात आले आहे. शनिवारी या निमित्त विविध इतिहासप्रसिद्ध आणि प्राचीन शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. काशी, महाकालेश्वर (उज्जैन) तसेच अन्य ज्योतिर्लिंगे येथे लक्षावधींच्या संख्येने भक्तांनी भगवान शंकरांचे दर्शन घेतले. असंख्य भक्तांनी उपवासाचे व्रतही केले. उज्जैन येथे 21 लक्ष दीपांचे प्रज्वलन करुन विश्वविक्रम करण्यात आला आहे.
काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी विशेषत्वाने उपस्थिती दर्शविली होती. किमान 10 लाख भाविकांनी या पवित्र तीर्थस्थळी दर्शन घेतले. काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून भव्य संकुलही निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे भक्तांचा उत्साह अधिकच पहावयास मिळाला आहे. त्याचप्रमाणे मध्यप्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वराच्या मंदिरातही भक्तांचा महापूर लोटला होता. शहरांमधील मंदिरांमध्येही मोठी गर्दी दिसून आली.
दीपप्रज्वलनाचा विश्वविक्रम
उज्जैनच्या अतीप्राचीन महाकालेश्वर मंदिराच्या परिसरात शनिवारी माहाशिवरात्री पर्वाच्या निमित्ताने सूर्य अस्तास गेल्यानंतर 21 लक्ष दीपांचे प्रज्वलन करण्यात आले. हा एक विश्वविक्रम म्हणून नोंद होण्याची शक्यता आहे. यापूर्वीचा दीप प्रज्वलन विश्वविक्रम अयोध्येत झाला होता. त्यात 15 लाख 76 हजार दीप प्रज्वलित करण्यात आले होते. अनेक मंदिरांमध्ये हे शिवरात्रीपर्व रविवारी रात्री 11 वाजेपर्यंत चालणार आहे. महाकालेश्वर मंदिरात भगवान महाकालाची पूजाअर्चा आणि अभिषेक करण्यात आला. त्याआधी महाकालाचा एखाद्या नवरदेवाप्रमाणे श्रृंगार करण्यात आला होता. ही प्रतिवर्षाची प्रथा आहे. हा श्रृंगार रविवारी उतरविण्यात येण्याची परंपरा आहे. येथेही लक्षावधी भाविकांनी दर्शनपुण्य मिळविले.
बाबा विश्वनाथाची श्रृंगार आरती
वाराणसी येथे विश्वेश्वराच्या मंदिरात शनिवारी पहाटे साडेतीन वाजता बाबा विश्वनाथ यांची महापूजा आणि श्रृंगार आरती करण्यात आली. त्यानंतर महाशिवरात्री पर्वाला प्रारंभ करण्यात येऊन मंदीर भक्तांच्या प्रवेशासाठी प्रथेप्रमाणे मुक्त करण्यात आले. मात्र. यंदा येथील ज्योतिर्लिंगाला स्पर्ष करण्यास भक्तांना अनुमती देण्यात आली नाही. तसेच थेट अभिषेक करण्यासही अनुमती नव्हती. मदिराबाहेर एका पाईपद्वारे भक्तांनी आणलेले अभिषेकाचे साहित्य ज्योतिर्लिंगापर्यंत पोहचविले जात होते. यामुळे काही भक्तांनी नाराजीही व्यक्त केली. मात्र हा निर्णय ज्योतिर्लिंगाच्या सुरक्षेसाठी घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते.

सोमनाथ येथे चार तास पूजा
गुजरातमध्ये द्वारका येथील सोमनाथ मंदिरात महाशिवरात्री पर्वामुळे चार तासांच्या विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महामृत्युंजय यज्ञही करण्यात आला. पहाटे चार वाजल्यापासून या मंदिरात भक्तांना प्रवेश देण्यात आला. या मंदिरातही दर्शनाचा कार्यक्रम रविवारपर्यंत चालणार आहे. बिहारच्या देवघर येथील बाबाधाम मंदीरही भक्तांनी ओसंडून वहात होते.
31 लाख रुद्राक्षांचे शिवलिंग
गुजरात येथील धर्मपूर येथे असलेल्या शिवमंदिरात 31 लाख रुद्राक्षांच्या साहाय्याने भव्य शिवलिंगाची रचना करण्यात आली होती. तर क्षिप्रा नदीतटावर संध्याकाळी शिवज्योती अर्पण कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला लक्षावधी भाविकांची उपस्थिती होती. या दीपार्पण कार्यक्रमासाठी मोठय़ा प्रमाणात तेल, रुईच्या वाती, कापूर इत्यादी साहित्य उपयोगात आणले गेले.









