पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांची कबुली ः आता ‘आयएमएफ’चा वाचवू शकणार असल्याचा दावा
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान दिवाळखोर झाला असून सद्यस्थितीला दहशतवादही तितकाच जबाबदार असल्याची कबुली दिली आहे. पाकिस्तानने पूर्वीपासून चुका केल्या असून सध्या आपण दिवाळखोर देशात जगत आहोत, असे भाष्य त्यांनी केले. तसेच दहशतवादाची सुरुवात पाकिस्तानच्या नेत्यांनी केली होती. दहशतवाद आम्हीच आणला, असेही संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी शनिवारी सांगितले.
सियालकोटमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी अनेक मुद्दे मांडत नोकरशहा आणि राजकारण्यांनी मोठय़ा चुका केल्याचे मान्य केले. देशातील सध्याच्या परिस्थितीसाठी मंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणा, नोकरशाही आणि राजकारण्यांना जबाबदार धरले आणि पाकिस्तानच्या घटनेकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) या संदर्भात मदत करू शकत नसल्याने पाकिस्तानच्या समस्यांवर तोडगा देशांतर्गतच शोधावा लागेल, असे ते पुढे म्हणाले. ‘आयएमएफ’ने मदत केली तरच देश सावरू शकतो असा दावा करत सध्या परिस्थती अवघड असल्याचेही त्यांनी मान्य केले.
पाकिस्तान सध्या अनेक आर्थिक समस्यांचा सामना करत आहे. देशात महागाईचा आगडोंब उसळला असून पेट्रोल-डिझेलसह अन्य इंधन दरांनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. जीवनावश्यक वस्तूंची महागाईही प्रमाणाबाहेर वाढली आहे. तसेच पाकिस्तानकडे आता केवळ 3 अब्ज डॉलर्स इतका विदेशी चलन साठा शिल्लक राहिला आहे. हे प्रमाण मागील 9 वर्षांमधील नीचांकी ठरले आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून पाकिस्तान अनेक आव्हानांना सामोरा जात असून दिवसेंदिवस त्यांची डोकेदुखी वाढत चालली आहे.
दहशतवादाबाबत ‘शहाणपण’
दहशतवाद कोणत्याही धर्मात किंवा पंथात भेद करत नाही. धर्माच्या नावाखाली दहशतवादाचा वापर करून मौल्यवान जीवांचा घात केला जातो. संपूर्ण देशाने दहशतवादाविरोधात एकजूट होण्याची गरज आहे, तरच त्याविरोधात लढा देता येईल. दहशतवादाबाबत आपण अजूनही सतर्क नाही. त्याचे वाईट परिणाम सातत्याने समोर येत आहेत, असेही आसिफ यांनी स्पष्ट केले. याचदरम्यान त्यांनी कराची पोलीस कार्यालयावरील दहशतवादी हल्ला हाणून पाडल्याबद्दल सुरक्षा दलांचे कौतुक केले. सुरक्षा जवानांनी रात्रभर दहशतवाद्यांशी धैर्याने मुकाबला केल्याचे ते म्हणाले.
आयएमएफकडून पाकिस्तानची निराशा
आर्थिक संकटामुळे बेहाल पाकिस्तानला बेलआउट पॅकेजवरून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत (आयएमएफ) कुठलाच करार करता आलेला नाही. बेलआउट पॅकेजवरून पाकिस्तान आणि आयएमएफ यांच्यात 10 दिवसांपासून सुरू असलेली चर्चा मागील आठवडय़ात निष्फळ ठरल्यामुळे पाकिस्तानला मिळणारे 57 हजार कोटी रुपयांचे कर्जही रखडले आहे. आयएमएफच्या पथकाचे प्रमुख नाथन पोर्टर यांनी पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांना सध्या कुठलीही घोषणा करण्यास मनाई केली आहे. वॉशिंग्टनमधील स्वतःच्या मुख्यालयातून करारावर शिक्कामोर्तब होत नाही तोवर याबद्दल कुठलेच विधान केले जाऊ नये असे सांगण्यात आले आहे. पाकिस्तानला दिवाळखोर होण्यापासून वाचविण्यासाठी आयएमएफचा तिसरा हप्ता महत्त्वाचा ठरणार आहे. कर्ज देण्यासाठी आयएमएफने अत्यंत कठोर अटी लादल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. आमच्या विचारापेक्षाही या अटी अधिक कठोर आणि धोकादायक आहेत, परंतु आमच्याकडे अन्य कुठलाच पर्याय नसल्याचे उद्गार पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अलिकडेच काढले होते.









