पाच दहशतवाद्यांचा खात्मा ः चार पोलिसांचाही मृत्यू
वृत्तसंस्था / कराची
पाकिस्तानातील कराची येथील पोलीस मुख्यालयावर शुक्रवारी संध्याकाळी काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस अधिकारी, एका रेंजरसह 4 जणांना प्राण गमवावे लागले. तर 18 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यादरम्यान झालेल्या संघर्षात पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पाकिस्तानी सुरक्षा दलाला यश आले आहे. पाकिस्तानची स्वतःची दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. टीटीपी ही पाकिस्तानातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना असून ती आपल्याच सरकारविरुद्ध लढत आहे.
कराची शहरातील शाहराह-ए-फैसल भागात असलेल्या 5 मजली पोलीस मुख्यालयात सायंकाळी 7 वाजता काही दहशतवादी घुसले. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये सुमारे 4 तास चकमक चालली. पाकिस्तानी मीडिया जिओ न्यूजनुसार दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात होते. पाचपैकी तीन दहशतवाद्यांनी स्वतःला उडवले. तर, इतर दोन दहशतवादी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. एकूण किती दहशतवादी होते हे स्पष्ट झालेले नाही.









