नियम मोडण्याच्या प्रमाणात यंदा गतवर्षीपेक्षा 206.96 टक्क्यांनी वाढ : महिनाभरात 41 हजार वाहनचालकांकडून अडीच कोटींहून अधिक दंड वसुली : जानेवारी 2022 ते आतापर्यंत तब्बल 38 कोटी 17 लाखांहून अधिक दंड वसूल,जानेवारी 2023 मध्ये तब्बल 2 कोटी 50 लाख 67 हजारांचा दंड
संदीप कांबळे /पणजी
वाहतूक खात्याने जानेवारी 2023 या एकाच महिन्यात 41 हजार 587 वाहनचालकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून तब्बल 2 कोटी 50 लाख 67 हजारांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक नियम मोडण्याचे प्रमाण मोठे असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 206.96 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी 2022 ते फेब्रुवारी 2023 च्या मध्यापर्यंत तब्बल 38 कोटी 17 लाख 9 हजार 200 ऊपयांची रक्कम दंडाच्या स्वऊपात वाहतूक पोलीस खात्याकडे आली आहे.
वाहतुकीचे नियम मोडले जाऊ नयेत, वाहतुकीत शिस्तबद्धता यावी, यासाठी वाहतूक पोलीस खाते प्रयत्न करीत असले तरी बेजबाबदार, बेशिस्त वाहनचालकांमध्ये वाहतूक नियम मोडण्याची खुमखुमी वाढतच आहे. वाहतूक खात्याने कारवाईची जोरदार मोहीम राबवूनही काही वाहनचालक नियम मोडून वाहने सुसाट हाकत आहेत. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यास काहीजण लोकप्रतिनिधींमार्फत दबाव आणून सुटका करून घेतात. त्यामुळे काहीवेळा पोलिसांना केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागत आहे.
बेशिस्तीमुळे अपघातांची मालिका
अपघातांची मालिका नव्या वर्षातही सुरूच असून, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून विना हेल्मेट गाडी चालविल्यामुळे बहुतेकजणांना जीवास मुकावे लागले आहे. ‘ओव्हर टेक’ करण्याचे प्रकार वाढले असून कोणत्याही बाजूने ओव्हर टेक करण्यात येत असल्याने अपघात घडतात. बहुतांश अपघात अतिवेगामुळे होतात. वाहतूक पोलिसांकडून नियमांबाबत जनजागृती करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच राज्यात अपघात वाढत आहे आणि ही राज्यासाठी चिंतेची बाब बनली आहे.
कारवाईनंतर पोलिसांवर येतो दबाव
विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यांविऊद्ध पोलिसांकरवी कारवाई केली जाते. परंतु काहीवेळा राजकीय नेत्यांशी जवळीक असल्याने नियम मोडलेल्यांवर कारवाई करताना पोलिसांवर दबाव येतो आणि त्यातूनच अशा लोकांचे फावत आहे. त्यामुळे कारवाई करताना पोलिसही काहीवेळा हतबल ठरत आहेत. जर वाढते अपघात रोखायचे असतील तर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.
2022 मधील अपघातांची नोंद
गेल्या 2022 सालात डिसेंबरअखेर 3 हजार 11 अपघातांची नोंद पोलिसांत झाली आहे. यामध्ये 271 जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये उत्तर गोव्यात 124 तर दक्षिण गोव्यात 147 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. 2021 मध्ये 2849 अपघात घडले होते. 2021 च्या सरासरीपेक्षा 2022 मध्ये अपघातांचे प्रमाण 05.68 टक्क्यांनी वाढलेले आहे.
दंड देऊनही चालक बेफामच…
वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दंड देऊनही बेजबाबदार वाहनचालकांकडून वाहने बेफाम चालवली जात आहेत. जानेवारी 2022 ते फेब्रुवारी 2023 या महिन्यांपर्यंत वाहतूक खात्याने तब्बल 38 कोटी 17 लाख 9 हजार 200 ऊपयांचा दंड वसूल केला आहे. त्यापैकी चालू वर्षातील जानेवारी महिन्यात तब्बल 2 कोटी 50 लाख 67 हजार इतका दंड वसूल झालेला आहे. याच महिन्यात सुमारे 41 हजार 587 जणांना चलन देण्यात आलेले आहे. गत 2022 मध्ये जानेवारी महिन्यात 81 लाख 66 हजार 200 ऊपये दंडाच्या स्वऊपात वाहतूक पोलिसांनी वसूल केले होते. गतवर्षीच्या सरासरीपेक्षा यंदा 206.96 टवके दंड वसूल झालेला आहे.
गेल्या एका महिन्यात तब्बल जण 39 ठार
सध्याचे 2023 सालही विविध प्रकारच्या अपघातांनी गाजत आहे. अपघाताची मालिका सुरूच असल्याने भविष्यात ही टक्केवारी वाढण्याची चिन्हे आहेत. गत जानेवारीत तब्बल 272 अपघातांची नोंद पोलिसांत झाली आहे. त्यामध्ये 39 जण ठार झाले आहेत, तर 31 जणांना गंभीर दुखापती झाल्या असून, 89 जण किरकोळ जखमी झालेले आहेत.
हजारो जणांचे वाहतूक परवाने निलंबित
वाहतूक सिग्नल नियम मोडून बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांवरही पोलिसांनी कडक कारवाई केलेली आहे. यामध्ये 3 हजार 396 चालकांचे वाहन परवाने निलंबित करण्याचे आदेश वाहतूक पोलीस खात्याने काढलेले आहेत.