ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावांत संपुष्टात, शमीचे 4, अश्विन-जडेजाचे प्रत्येकी 3 बळी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ला
मोहम्मद शमीने चतुराईने केलेली गोलंदाजी आणि रवींद्र जडेजा-आर.अश्विन यांच्या भेदक फिरकीमुळे भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावांत गुंडाळला. दिवसअखेर भारताने बिनबाद 21 धावा जमविल्या होत्या. रोहित 13 व केएल राहुल 4 धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या डावात उस्मान ख्वाजा व पीटर हँड्स्कॉम्ब यांनी अर्धशतके नोंदवली.

पहिल्या कसोटीत निराशा केलेल्या उस्मान ख्वाजाने या सामन्यात त्याची भरपाई करीत आकर्षक 81 धावांचे अर्धशतकी योगदान दिले तर हँड्स्कॉम्बने निर्धारी खेळ करीत नाबाद 72 धावा जमविल्या. पण या दोघांना इतरांकडून पुरेशी साथ न मिळाल्याने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 78.4 षटकांत 263 धावांत संपुष्टात आला. भारतातर्फे शमीने वैविध्यपूर्ण गोलंदाजीचे उत्तम प्रदर्शन करीत चार बळी टिपले. त्याने हे बळी नवा, अर्धा जुना व पूर्ण जुना झालेल्या चेंडूवर मिळविले. ऑस्ट्रेलियन संघ नियंत्रण मिळवतोय असे वाटत असताना महत्त्वाच्या क्षणी जडेजा व अश्विन यांनी बळी मिळविले. दोघांनीही प्रत्येकी तीन बळी मिळविले. केएल राहुलने पॉईंट क्षेत्रात उस्मान ख्वाजाच्या रिव्हर्स स्वीपवर टिपलेला अप्रतिम झेल हे आजच्या खेळातील एक वैशिष्टय़ ठरले. या झेलामुळे ख्वाजा व हँड्स्कॉम्ब यांनी सहाव्या गडय़ासाठी केलेली 59 धावांची भागीदारीही संपुष्टात आली आणि ऑस्ट्रेलियाही पुन्हा बॅकफूटवर आले.
खेळपट्टी फिरकीस अनुकूल ठरणारी संथ खेळपट्टी आहे. मात्र नागपूरच्या खेळपट्टीपेक्षा त्यावर चेंडू बऱयापैकी वर येतो. त्याचाच उपयोग ख्वाजाने करून घेत 125 चेंडूंच्या खेळीत 12 चौकार, एक षटकार मारला. पहिल्या सत्रात कर्णधार रोहितने शमीला दुसऱया बाजूने वापर केला आणि शमीनेही हुशारीने गोलंदाजी करीत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविला. सिराजला बळी मिळाला नसला तरी त्याने वॉर्नरला बरेच जखडून ठेवले. ख्वाजासमवेत त्याने 50 धावांची भागीदारी केली असली तर वॉर्नर बराच झगडताना दिसून आला. एक चेंडू त्याच्या हाताच्या कोपराला लागला तर दुसरा हेल्मेटला लागल्यावर तो थोडासा नर्व्हस झाल्याचे दिसले. शमीने एक किंचित वाईड चेंडू टाकत आत वळवला. चेंडू इतका अचूक होता की वॉर्नरला तो व्यवस्थित तटवता आला नाही.

अ़श्विनने नंतर भारताला बेकथ्रू मिळवून देताना मार्नस लाबुशेन व स्टीव्ह स्मिथ यांना झटपट बाद केले तर हेडला शमीने बाद केल्यानंतर 1 बाद 91 अशा स्थितीवरून ऑस्ट्रेलियाची 4 बाद 108 अशी स्थिती झाली. लाबुशेन 18 तर स्मिथ शून्यावर बाद झाला. अश्विनने ऑफब्रेकवर लाबुशेनला पायचीत केले तर स्मिथ दोन चेंडूनंतर यष्टिरक्षक भरत कोनाकरवी झेलबाद झाला. कोनाला जलद हालचाली आणि उत्तम तंत्र उपयोगी पडले.
उपाहारानंतर शमीने आणखी एक भेदक स्पेल टाकला. त्याने हेडला प्रथम बाद केले. शमीने यष्टीजवळून टाकलेला चेंडू ड्राईव्ह करण्यायोग्य नव्हता. हेडच्या बॅटची कड घेऊन उडालेला झेल दुसऱया स्लिपमध्ये केएल राहुलने अचूक टिपला. ख्वाजा व हँड्स्कॉम्ब यांनी अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर ख्वाजा राहुलने टिपलेल्या अप्रतिम झेलावर बाद झाला. ऍलेक्स कॅरेलाही अश्विनने शून्यावर बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाची स्थिती 6 बाद 168 अशी झाली. खेळपट्टी यावेळी फलंदाजीसाठी कठीण वाटत नव्हती. त्यामुळे ख्वाजा व हँड्स्कॉम्ब यांनी सहज भागीदारी केली. हँड्स्कॉम्बने भारतीय फिरकीचा समर्थपणे मुकाबला करताना पदलालित्याचा चांगला उपयोग केला. त्याने 142 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार मारत नाबाद 72 धावा केल्या. त्याची ही खेळी ऑस्ट्रेलियाच्या तीन डावांतील सर्वोत्तम खेळी असल्याचे मानले जात आहे.
कर्णधार कमिन्सने प्रतिहल्ला करीत उपयुक्त योगदान देताना 59 चेंडूत 33 धावा फटकावल्या. त्यात 3 चौकार, 2 षटकारांचा समावेश होता. 6 बाद 227 अशा स्थिती होती तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ तीनशेचा टप्पा पार करेल असे वाटत होते. पण जडेजाने त्यांचे मनसुबे उधळून लावताना कमिन्स व टॉड मर्फी यांचे झटपट बळी मिळविले. नंतर शमीने लियॉन व कुहनमन यांचे बळी मिळवित ऑस्ट्रेलियाचा डाव 79 व्या षटकात संपुष्टात आणला.
रोहित शर्माने दुसऱयाच चेंडूवर कमिन्सला चौकार ठोकत भारतीय डावाची सुरुवात केली. दिवसअखेर 9 षटकांत भारताने बिनबाद 21 धावा जमविल्या असून रोहित 13 व राहुल 4 धावांवर खेळत आहेत. दुसऱया दिवशी भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर आघाडी मिळविण्यासाठी प्रयत्न करेल. रोहितने पहिल्या कसोटीत शतक नोंदवले होते, त्याची पुनरावृत्ती करण्याचा त्याचा प्रयत्न करेल, अशी अपेक्षा आहे.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया पहिला डाव 78.4 षटकांत सर्व बाद 263 ः वॉर्नर 15 (44 चेंडूत 3 चौकार), उस्मान ख्वाजा 81 (125 चेंडूत 12 चौकार, 1 षटकार), लाबुशेन 18 (25 चेंडूत 4 चौकार), स्मिथ 0, हेड 12 (30 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), पीटर हँड्स्कॉम्ब नाबाद 72 (142 चेंडूत 9 चौकार), कॅरे 0, कमिन्स 33 (59 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), मर्फी 0, लियॉन 10 (26 चेंडूत 2 चौकार), कुहनमन 6, अवांतर 16. गोलंदाजी ः शमी 4-60, अश्विन 3-57, जडेजा 3-68, अक्षर 0-34, सिराज 0-30.
भारत प.डाव बिनबाद 21 ः रोहित शर्मा खेळत आहे 13 (34 चेंडूत 1 चौकार), राहुल खेळत आहे 4, अवांतर 4.









