स्टिंग ऑपरेशन भोवले, शिवसुंदर दास अंतरिम अध्यक्ष बनण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीने केलेल्या त्यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर वरिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यात ते गोपनीय माहिती उघड करताना दिसले होते. दरम्यान, शिवसुंदर दास हे निवड समितीचे अंतरिम अध्यक्ष बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दास हे मध्य विभागाचे प्रतिनिधीत्व करतात आणि सध्याच्या निवड समिती सदस्यांमध्ये ते सर्वांत जास्त 23 कसोटी सामने खेळलेले आहेत.

चेतन यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. स्टिंग ऑपरेशननंतर त्यांची स्थिती अस्थिर झाली होती. त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिलेला असून त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले नव्हते, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी शुक्रवारी नाव उघड न करण्याच्या अटीवर बोलताना सांगितले.
बंगाल आणि सौराष्ट्र यांच्यातील रणजी चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी चेतन शर्मा इतर निवड समिती सदस्यांसह कोलकातामध्ये आले होते. इराणी चषक संघ निवडण्यासाठी ते तेथे आले होते. मात्र आपला राजीनामा स्वीकारण्यात आल्यानंतर चेतन शर्मा हे दिल्लीला परतले व विमानतळावर त्यांची प्रतीक्षा करणाऱ्या पत्रकारांना त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. झी न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या दरम्यान बरेच खेळाडू 80-85 टक्के तंदुऊस्त असूनही स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परत येण्यासाठी इंजेक्शन घेतात, असा आरोप करताना ते दिसले होते.
दुखापत झालेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या सप्टेंबरमधील ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या ‘टी20’ मालिकेसाठी परत येण्यावरून आपल्यात आणि संघ व्यवस्थापनामध्ये मतभेद आहेत, असा दावा चेतन यांनी केला होता. ‘टी20’ संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या, वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि दीपक हुडा नियमितपणे आपल्याला निवासस्थानी भेटतात, असाही दावा त्यांनी केला होता. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील संबंधांबद्दल देखील ते त्यात बोलले होते आणि कोहली व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील संघर्ष हा अहंकाराचा संघर्ष असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन शर्मां यांच्या टिपण्या बीसीसीआयच्या उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांना बरोबर वाटल्या नाहीत आणि यामुळे सध्याच्या राष्ट्रीय संघातील सदस्यांचा त्यांच्यावरील विश्वासही उडाला आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांचा त्याच्यावरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. निवड समितीच्या बैठकीवेळी ते त्यांच्यासोबत टेबलावर एकत्र बसू शकले नसते. कारण त्यांनी सर्व आदर गमावला आहे. त्यांनी मिळेल तसे बोलण्याची किंमत मोजली आहे, असे बीसीसीआयच्या अन्य सूत्रांनी सांगितले.









