वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने 15 फेब्रुवारी रोजी तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या गोंधळाबद्दल माफी मागितली आहे. त्यात भारताला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर दाखविण्यात आले होते आणि त्यानंतर लगेच ऑस्ट्रेलियाला अग्रक्रमांकावरील संघ म्हणून पुन्हा स्थापित करण्यात आले होते.
नागपूर कसोटीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतल्यानंतर बुधवारी घडलेल्या घडामोडींमुळे भारतीय संघ खेळाच्या तिन्ही प्रकारांमध्ये अव्वल स्थान राखण्यास सज्ज झाला आहे, असे भासले होते. कारण ताज्या बदलाने भारताला आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान दिले होते. तथापि, नंतर लगेच क्रमवारीत बदल करण्यात आला आणि ऑस्ट्रेलियाने 126 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. भारत सध्या 115 गुणांसह यादीत दुसऱया स्थानावर आहे.









