भारतासह 30 देशांच्या निवडणुकांवर परिणाम केल्याचा हॅकर्सचा दावा
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ईस्रायलमधील हॅकर्स जगभरातील 30 हून अधिक देशांच्या निवडणुकांमध्ये हेराफेरी करत आहेत. हे हॅकर्स सोशल मीडियावर खोटय़ा बातम्या पसरवतात. हे हॅकर्स भारताबरोबरच अमेरिका आणि ब्रिटनमध्येही असेच घोटाळे करत आहेत. ब्रिटनमधील ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राच्या एका विशेष वृत्तामधून ही बाब समोर आली आहे.
फेक न्यूज पसरवणाऱया हॅकर्स ग्रुपच्या नेत्याचे नाव ताल हनान जॉर्ज असे आहे. तो इस्रायलच्या स्पेशल फोर्समध्ये होता. गेल्या 20 वर्षांपासून तो बनावट नावाने जगभरातील देशांमध्ये निवडणूक हेराफेरी आणि खोटय़ा बातम्या पसरवत आहे. त्याचे सहकारी ‘टीम जॉर्ज’ या सांकेतिक नावाने काम करतात. हेराफेरीचे फुटेज आणि कागदपत्रे आंतरराष्ट्रीय पत्रकार संघाकडे उपलब्ध आहेत. ताल हनान उर्फ जॉर्ज यांनी ‘डेमोमन इंटरनॅशनल’ कंपनीची नोंदणी केली आहे. या कंपनीला इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने प्रोत्साहन दिले आहे. टीम जॉर्जच्या खुलाशानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्रालय गप्प आहे. या खुलाशानंतर ताल हनान उर्फ जॉर्जनेही मौन बाळगले आहे. टीम जॉर्जच्या कामकाजामुळे मोठय़ा टेक कंपन्यांना धोका निर्माण झाला आहे. या कंपन्या अनेक वर्षांपासून खोटय़ा बातम्या आणि सुरक्षेच्या मुद्यांशी लढत आहेत. जगातील लोकशाही देशांत निःष्पक्ष निवडणुका घेणेही आव्हान ठरत आहे.
मेल, सोशल मीडिया, वेबसाईट हॅक
आमचे काम गुप्तपणे हेराफेरी करणे किंवा जनमतावर प्रभाव टाकणे आहे. गुप्तचर संस्थांव्यतिरिक्त आम्ही राजकीय प्रचार आणि खाजगी कंपन्यांसाठीही काम करतो. आफ्रिका, दक्षिण-मध्य अमेरिका व्यतिरिक्त यूएसए आणि युरोपमध्ये आमचे नेटवर्क असल्याचे हॅकर्सचे नेते जॉर्ज यांनी ‘गार्डियन’च्या बातमीदारांना सांगितले. जॉर्जच्या टीमकडे खास सॉफ्टवेअर पॅकेजेस आणि मीडिया मॅनिप्युलेशन उपकरणे असून मेल किंवा सोशल मीडियाशी संबंधित यंत्रणा हॅक करण्याची क्षमताही त्यांच्यामध्ये आहे.
चौकशीची काँग्रेसची मागणी
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा आणि सुप्रिया सुनेत यांनी गुरुवारी या विषयावर पत्रकार परिषद घेतली. भाजपचा आयटी सेल जे काम करतो तेच काम टीम जॉर्ज करते. दोघांनी निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी खोटय़ा बातम्या पसरवल्या. यासाठी भाजप विदेशी हॅकर्सचे नेटवर्क वापरत आहे. पेगॅसस प्रकरण सरकारने दडपले होते, असे खेडा यांनी म्हटले आहे. तसेच भारतात 18 हजार सोशल मीडिया अकाउंट्स भाजपसाठी खोटय़ा बातम्या पसरवत आहेत. भारतातील लोकशाही भाजपने हायजॅक केली आहे. इस्त्रायली एजन्सी हे काम करत आहे. सरकार काही करत नसेल, तर निवडणुकांमध्ये ढवळाढवळ करण्यासाठी स्वतःची मदत घेत आहे. यापूर्वीही मोदी सरकारवर असेच आरोप झाले आहेत, असे सुप्रिया सुनेत म्हणाल्या.









