जॉर्ज सोरोस यांच्यावर ‘संयुक्त प्रतिवार’ अदानी प्रकरणावरून भारताच्या विश्वासार्हतेला तडा जाणार असल्याचा दावा फेटाळला
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन, नवी दिल्ली
अमेरिकेचे अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी अदानी समूह प्रकरणावरून भारतावर निशाणा साधला आहे. अदानी प्रकरणावर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन बाळगून असले तरी त्यांना परदेशी गुंतवणूकदार आणि संसदेला उत्तर द्यावेच लागेल, असे सोरोस यांनी म्हटले आहे. तथापि, सोरोस यांच्या या टीकेला सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने कठोर शब्दात ‘समाचार’ घेतला आहे.
जर्मनी येथे होत असलेल्या म्युनिक सुरक्षा संमेलनाच्या आधी जॉर्ज सोरोस यांनी म्युनिक विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलत असताना भारताविषयी भाष्य केले आहे. फायनान्शियल टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखात जॉर्ज सोरोस यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला करताना अनेक प्रश्न उपस्थित केले होते. अदानीमुळे पंतप्रधान मोदी कमकुवत झाले आहेत आणि त्यांना आता संसद आणि गुंतवणूकदारांना उत्तर द्यावे लागेल, असे म्हटले होते. अदानी समूहाने शेअर मार्केटला वेठीस धरल्यामुळे भारताच्या विश्वासार्हतेला तडा गेल्याचा दावा सोरोस यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भांडवलदारांना झुकते माप देत असल्याचा आरोपही जॉर्ज सोरोस यांनी केला.
मोदी आणि अदानी यांचे चांगले संबंध असल्यामुळे भारतात मोदींची सरकारवरील पकड नक्कीच कमकुवत होईल. तसेच संस्थात्मक सुधारणांसाठी हे प्रकरण एक नवे दालन उघडू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस हे ओपन सोसायटी फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांची संपत्ती 8.5 अब्ज डॉलर्स एवढी आहे. लोकशाहीवादी, पारदर्शकतेला प्राधान्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी काम करणाऱया गटांना ते निधी पुरवत असतात.
भाजपने जॉर्ज सोरोसना फटकारले
सोरोस यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पंतप्रधान मोदींविरोधातील विदेशी षड्यंत्राचा खुलासा केला. पंतप्रधान मोदींची बदनामी करण्यासाठी अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस भारतात राजकीय पक्षांना निधी देऊन लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला अस्थिर करू इच्छित आहेत, असे त्या म्हणाल्या. जॉर्ज सोरोस यांचे वक्तव्य म्हणजे भारतावरील हल्ला असून या हल्ल्याला प्रत्येक भारतीयाने चोख प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन स्मृती इराणी यांनी केले.
आरोपांवर काँग्रेसचे स्पष्टीकरण
अमेरिकेतील अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्यावर आता भाजापापाठोपाठ काँग्रेसनेही टीका केली आहे. स्मृती इराणी यांच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसनेही सोरोस यांना चोख शब्दात प्रत्युत्तर दिले. पंतप्रधानांच्या अदानी घोटाळय़ामुळे भारतात लोकशाही पुनरुत्थान सुरू होते की नाही हे सर्वस्वी काँग्रेस, विरोधी पक्ष आणि आमच्या निवडणूक प्रक्रियेवर अवलंबून आहे. त्याचा जॉर्ज सोरोसशी काहीही संबंध नाही. आमचा नेहरूवादी वारसा हे सुनिश्चित करतो की त्यांच्यासारखे लोक आमचे निवडणूक निकाल ठरवू शकत नाहीत. भारतात ज्या निवडणुका होतील त्याचे निकाल काय लागावेत हे सांगणे जॉर्ज सोरोस यांच्यासारख्या विदेशी व्यक्तीने ठरवू नये असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सुनावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अदानी घोटाळय़ावरून आरोप होत आहेत. त्यानंतर आता भारतात लोकशाहीच्या दृष्टीने काही बदल घडणार का? हे विरोधी पक्ष म्हणजेच आम्ही आणि इतर प्रमुख पक्षांवर अवलंबून आहे. तसेच आमची निवडणूकही लवकरच होणार आहे. पण जॉर्ज सोरोससारख्या लोकांना याच्याशी काहीही देणे-घेणे असण्याचे कारण नाही, असे ते पुढे म्हणाले.
चुकीच्या हेतूपुढे झुकणार नाही!
आज आपण जॉर्ज सोरोस यांना एकजुटीने उत्तर देऊया. देशात लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार आणि आपले पंतप्रधान चुकीच्या हेतूंपुढे झुकणार नाहीत. याआधीही आम्ही परकीय शक्तींचा पराभव केला असून भविष्यातही इतर विदेशी शक्तींचा पराभव करू!
– स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री
जॉर्ज सोरोसनी नाक खुपसू नये!
आमच्या देशाचा विचार हा नेहरूवादी विचारसरणी आहे. जॉर्ज सोरोससारख्या लोकांनी आमच्या देशांतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसू नये असेच आम्हाला आमचा विचार आणि आमची शिकवण सांगते. सोरोससारख्या लोकांना याच्याशी काहीही देणे-घेणे असण्याचे कारण नाही!
– जयराम रमेश, काँग्रेस नेते









