मध्यप्रदेशातील महादेवाचा डोंगर येथे तापीचा उगम. पूर्वीचा गोंडवनाचा भाग. ही नदी खंबायतच्या आखातातून सुरत जिल्ह्य़ात अरबी समुद्रात मिळते. महाराष्ट्राबाहेर उगम पावते आणि महाराष्ट्राबाहेर समुद्राला मिळते पण जास्तीत जास्त प्रवास महाराष्ट्रातून होतो. खानदेशातली जीवनदायिनी, शेतीला सुजलाम सुफलाम करणारी तापी म्हणजे भाग्यरेषाच. महाराष्ट्रात गोदावरी खालोखाल हिला महत्त्वाचे स्थान. फक्त ही नदी पश्चिम वाहिनी होते. हिचा प्रवास सातशे चोविस किलोमिटरचा. अनेक उपनद्या येऊन मिळतात पण हिचा प्रवास मात्र अतिशय रम्य ठिकाणातून सुरू असतो. उत्तरेला सातपुडा रांगा तर दक्षिणेला अजंठा सातमाळा रांगा. अशा अतिभव्य पर्वतामधून वाहताना अनेक नद्या आनंदाने धावत धावत नदीच्या गळय़ात येऊन पडतात आणि तिचे खोरे विस्तारत जाते. ही नदी ज्या ठिकाणी आपली दिशा बदलते तिथे ती चक्राकार होते. त्या स्थानाला फार मोठे महत्त्व प्राप्त होते. जसे गोदावरीत चक्रतीर्थ तसे तापी ज्या ठिकाणी पश्चिमेला वळते त्या ठिकाणाला सूर्यमुख म्हणतात. तिथे म्हणजे बैतुल जिल्ह्य़ातील मुल्ताई किंवा मूळतापी येथे पूजा असते. तापी आणि नर्मदा या दोन्ही पश्चिम वाहिनी नद्या. तापीच्या परिसरात आदिवासी लोक जास्त प्रमाणात दिसतात. त्यांच्या समजुतीनुसार रावण आणि मेघनाद या दोघांच्या प्रभावामुळे या नद्या पश्चिम वाहिनी झाल्या असाव्या. प्रभू रामचंद्रनी अनेक शिवलिंगाची स्थापना केली असावी असेही मानतात. ही मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र याच्या सीमेवरून वाहत जाते. चिखलदरा येथून कापरा, सीपना, गाडगा या नद्या तापीला डाव्या बाजूस मिळतात तर याच परिसरात चिखलदरा, मेळघाट, इथला व्याघ्रप्रकल्प आणि नरनाळा, गावीलगड हे किल्ले गोंड शैलीची, वैभवाची साक्ष देतात. हा किल्ला येथील मूर्ती म्हणजे विदर्भाच्या शिरपेचातील मानाचा तुरा.
यमुना
हिमालयात 1100 फुटावर जम्नोत्री येथे उगम पावते.
कथा… यमुनेचे लावण्य पाहून बलरामाने जलक्रीडेसाठी बोलावले पण तिला उशीर झाला. बलरामाने तिला नांगराने वृंदावन खेचून आणले आणि मथुरा शहर तिच्या किनारी वसवले. कृष्ण बाळलिला, खेळ, कालिया मर्दन केले, भरताचा अश्वमेधाचा यज्ञ इथेच झाला. जगप्रसिद्ध ताजमहाल इथेच. यमुना आग्रा इथून धावत प्रयागला येते व गंगेला मिळते. सूर्य आणि संज्ञा यांची मुलगी यमुना कलिंद पर्वतावर उगम पावते म्हणून कालिंदी. इथे वैवस्वत मनुने संतती प्राप्तीसाठी तप केले. गोपिंना कात्यायनी व्रत सांगितले. नदीचं पाणी कृष्ण नादाने वेडावले, नदीचा तट पुनीत झाला, भक्तिरसाने नाहून निघाला.








