अमेरिकेच्या विदेश मंत्र्यांनी केले स्पष्ट ः तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानवरही बंदी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीन आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या यादीतून हटविले जाणार नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकन यांनी एका समीक्षेदरम्यान यासंबंधी भूमिका स्पष्ट केली आहे.
ब्लिंकन यांच्या निर्णयाला फेडरल रजिस्टरमध्ये गुरुवारी अधिसूचित करण्यात आले. त्यांचा हा निर्णय तहरीक-ए-तालिबान, हिजबुल मुजाहिदीन आणि द आर्मी ऑफ इस्लाम (अन्य त्यांचे अन्य सहकारी) यांच्या दहशतवादी कारवायांच्या समीक्षेनंतर घेण्यात आला आहे. या समीक्षेत अमेरिकेची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा विचारात घेण्यात आली आहे.

हिजबुल मुजाहिदीनला विदेशी दहशतवादी संघटनेच्या यादीत करण्यात आलेला समावेश कायम राहणार आहे. त्यांच्यावरील बंदी हटविण्यात येणार नसल्याचे ब्लिंकन यांनी समीक्षेनंतर म्हटले आहे. तत्पूर्वी ब्लिंकन यांनी ऍटर्नी जनरल आणि ट्रेझरी सेपेटरी यांच्याशी सल्लामसलत केली होती.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला अमेरिकेकडून सप्टेंबर 2010 मध्ये दहशतवादी संघटनांच्या यादीत सामील करण्यात आले होते. या संघटनेचे म्होरके हकिमुल्ला मसूद आणि वाली उर्रहमान यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी मानले गेले होते. ही दहशतवादी संघटना अफगाण-पाकिस्तान सीमेवर कार्यरत आहे. हिजबुल मुजाहिदीनला अमेरिका, कॅनडा, भारत आणि युरोपीय महासंघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या यादीत सामील केले आहे.









