मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना : तरुण भारतच्या निपाणी कार्यालयाचा वर्धापनदिन थाटात
प्रतिनिधी/ निपाणी
भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत उगम पावलेल्या तरुण भारत वृत्तपत्राने शंभर वर्षांनंतरही सामाजिक बांधिलकी कायम ठेवली आहे. स्वातंत्र्यलढा, गोवा मुक्तीसंग्राम, सीमालढा याबरोबरच गल्ली ते दिल्लीपर्यंत झालेल्या अनेक आंदोलनांचा साक्षीदार तरुण भारत ठरला आहे. अनेकदा सार्वजनिक समस्यांविरोधात प्रस्थापितांना सळो की पळो करून सोडणारे दैनिक म्हणून ओळखला जाणारा तऊण भारत आज निर्भिड लिखाणामुळे घराघरात आणि जनतेच्या मनामनात टिकून आहे, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
दैनिक तरुण भारतच्या निपाणी कार्यालयाचा 29 वा वर्धापनदिन बुधवारी थाटामाटात पार पडला. प्रारंभी कार्यालयीन कर्मचारी आदिनाथ कुंभार आणि शुभांगी कुंभार दाम्पत्याच्या हस्ते सत्यनारायण पूजा पार पडली. यानंतर खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते तरुण भारतच्या वर्धापनदिन विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. संपादक जयवंत मंत्री यांच्यासह जाहिरात विभागाचे सोहन पाटील, कलमेश हुन्नुरकर, निपाणी कार्यालय प्रमुख भानुदास कोंडेकर यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.
यावेळी खासदार जोल्ले यांच्यासह प्राणलिंग स्वामीजी, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, युवा नेते रोहन साळवे, सुजय पाटील, जिल्हा पंचायत माजी उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अच्युत माने, जि. पं. माजी सदस्य राजेंद्र वड्डर, रत्नशास्त्राr ए. एच. मोतीवाला, रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार, दलित क्रांतीसेनेचे अशोककुमार असोदे, विनोद बागडे यांच्यासह मान्यवरांनी पुरवणीचे कौतुक केले.









