अध्याय पंचविसावा
सत्व आणि रजोगुणाची वैशिष्टये सांगून झाल्यावर भगवंत उद्धवाला तमोगुणाची वैशिष्टये सांगताना म्हणाले, अज्ञान हे तमोगुणाचे स्वरूप आहे. आळस आणि बुद्धीची मूढता हे त्याचे स्वभाव होत. जेंव्हा तो वाढून सत्त्वगुण आणि रजोगुणाला मागे टाकतो, तेंव्हा माणूस आकांक्षा, शोक, मोह, हिंसा, निद्रा, आळस यांना वश होतो. त्याच्या हातून मोठय़ा मानभावीपणाने, विश्वास दाखवून परद्रव्य बुडविण्याचे कार्य घडते किंवा परस्त्रीगमन घडते, तेंव्हा तमोगुण वाढला असे समजावे. स्वमुखाने दुसऱयाचे दोष उच्चारणे, साधूची निंदा करणे, संतसज्जनांचा द्वेष करणे ही लक्षणे जेथे दिसतील तेथे तमोगुणाचे ठाणे पक्के होऊन बसलेच आहे असे समजावे. धुके आले म्हणजे त्याच्या योगाने सूर्यावर झाकण पडते, त्याप्रमाणे विवेकाच्या अस्तित्वालाही तमोगुण झाकून टाकतो. काय चूक, काय बरोबर असा कोणताही विचार न करता मी करतोय तेच बरोबर आहे असा त्याचा खाक्मया असतो. सत्त्वगुण हा प्रकाश देणारा आहे, रजोगुण प्रवृत्ती वाढविणारा आहे पण ह्या दोघांना गिळून तमोगुणाची वाढ अधर्माच्या योगाने वाढतच जाते. श्रे÷ांचा अपमान केला असता किंवा साधूचे गुणदोष पाहू लागले असता तमोगुण मोठय़ा प्रमाणात वाढतो. त्याचे होणारे गंभीर परिणाम सांगतो. तमोगुण भरपूर वाढला म्हणजे स्फूर्ति मंद होते, तमोगुण बुद्धिनाश उत्पन्न करून जिवाला जड करून सोडतो. कार्य कोणते व अकार्य कोणते या विचाराचे जे ज्ञान, त्याची स्फूर्ति पूर्णपणे आंधळी होऊन जाते. ह्याचे नाव मूढपणा. चित्त जागृतीत असूनही अर्थ, स्वार्थ, परमार्थ किंवा कृत्याकृत्य काहीएक स्फुरत नाही, ह्याला लय असं म्हणतात. सर्व इंद्रियांचे व्यापार उद्योग न केल्यामुळे खुंटून जातात आणि ज्ञानशक्ती पूर्णपणे लोपून जाते, ह्याचे नाव जडत्वप्राप्ती. मूढत्वाच्या योगाने शोक व दुःख प्राप्त होते. जडत्वाने मिथ्या मोह उत्पन्न होतो आणि मोहामुळे अधर्मामध्ये अत्यंत अविचारीपणा होऊन पाप घडते. अहोरात्र अतिशय निद्रा येते. तामसाला निदेशिवाय दुसरे ब्रह्मानंदाचे सुखही आवडत नाही. तमोगुण पूर्ण वाढला असता पुरुषाची अशी स्थिती होते. आता सत्त्वादि गुण वाढले म्हणजे कोणते फळ प्राप्त होते ते सांगतो. जेंव्हा चित्त प्रसन्न असते, इंद्रिये शांत असतात, देह निर्भय असतो आणि मनामध्ये आसक्ती नसते, तेव्हा सत्त्वगुण वाढलेला आहे असे समजावे. माझ्या प्राप्तीचे सत्त्वगुण हे साधन आहे. सत्त्वगुण वाढला असता चित्त सदासर्वकाल सुप्रसन्न असते आणि काम, क्रोध व लोभ यांचे स्फुरण मुळीच स्फुरत नाही. विषयासाठीच जे चित्त वणवण करत असते, त्यालाच विषयोपभोगांचा कंटाळा येतो. विषय जरी अंगावर आदळले, तरी तो विषयसंगामध्ये गुंतत नाही. ज्याप्रमाणे पाण्यातच राहणाऱया कमलिनीचे पान पाण्यापासून अलिप्त असते, त्याप्रमाणे माझ्या ज्ञानामुळे चित्त विषयात असूनही, त्या विषयांपासून अलिप्त असते. देहाला मरणाचे भय हे नेहमीचेच आहे. ते मरण देहाजवळ येऊन ठेपले तरी सात्त्विकाच्या मनात भय उत्पन्न होत नाही. कारण असे सात्त्विक लोक माझ्या पायांशी भक्तिपूर्वक रंगलेले असतात. जोपर्यंत ‘मी तू’ पणा भासतो, तोपर्यंत मरण आवश्य बाधक होते. पण सात्त्विक भक्त माझ्या अधिकाराहून निराळा नसतो, म्हणून त्याला मरणाचे भय नाही. सात्विक असतो तो माझ्या चरणी अनन्यभावाने शरण आलेला असतो. म्हणून त्याला जन्ममरण बाधक होत नाही. सत्त्वगुण माणसाला अशा रीतीने वागवीत असतो. आता रजाचे लक्षण ऐक. जेंव्हा कर्म करीत असताना जीवाची बुद्धी चंचल, ज्ञानेंद्रिये असंतुष्ट, कर्मेंद्रिये अस्वस्थ आणि मन भ्रांत होते, तेंव्हा रजोगुणाचा जोर वाढला आहे, असे समजावे. रजोगुण खवळला असता अत्यंत भयंकर अशी विषयाची चिंता उत्पन्न होते. त्यामुळे कर्मेंद्रियांनी नाना प्रकारचे थाटमाट आरंभतो. शरीर स्वस्थ असले तरीसुद्धा मन चिंतातुर आणि अत्यंत भ्रांत असते. विषयांचा स्वार्थ वाढवून नेहमी दुःखी होते. मुलेबाळे, धन, संपत्ती वगैरे असताही तो रजोगुण मनामध्ये अधिक स्वार्थ वाढवतो.
क्रमशः








