सकाळ नुकतीच वर आलेली असते. शहरातला सूर्य शांतपणे, लोकांच्या धावपळीत अडथळा येणार नाही अशा रीतीने चालत सुटलेला असतो. लोकल्स, बसेस, रिक्षा, टू व्हीलर्स, कार्स यांची रेस हळूहळू सुरू झालेली असते. देवळात शांतपणे पूजापाठ सुरू असतात. चर्चमध्येही त्यांची नैमित्तिकं सुरू असतात. मशिदीतली बांग स्पीकरवरून वाजून संपलेली असते. आता राज्य पं. भीमसेन जोशी, पं. अभिषेकी बुवा, अजित कडकडे यांच्याकडे आलेलं असतं. पंढरपुरिचा निळा, सावळे, सुंदर रूप मनोहर, निघालो घेऊन दत्ताची पालखी वगैरे सिग्नेचर गाणी वाजायला लागलेली असतात. नियमित स्वभावाचा माणूस नेमक्मया वेळेत उठलेला असतो. वेळेत आवरण्याचं गणित उरकतं. मग ऑफिसवेअर अंगावर चढवलं जातं. शूज घालून रेडी होताच एक सर्वात महत्त्वाची गोष्ट कानावर चढते. ती म्हणजे इअरबडस किंवा हेडसेट! मग घरातून बाहेर पडताना एका वेगळय़ा जगात प्रवेश होतो. सभोवताली असलेल्या प्रचंड गर्दीचा, धावपळीचा भाग झालेला माणूस आत आत त्याच्या एका स्वतंत्र वर्तुळात पुढे पुढे सरकत जातो. बस, रिक्षा, टेन पकडली जाते. सीट मिळाली, न मिळाली तरी उभ्याने, एका पायावर प्रवास सुरू होतो. पण इकडे गाणं सुरू असतं.
दो दीवाने इस शहर में
रात में या दोपहर में
आब ओ दाना ढूँढते हैं
आशियाना ढूँढते हैं
अमोल पालेकर आणि झरीना वहाब यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्याचं एक स्टॅसिस तयार झालेलं असतं. अशी अनेक गाणी घेऊन अनेक माणसं आपापल्या स्टॅसिससोबत रोज प्रवास करतात. घरातल्या चिंता, काळज्या, कदाचित सकाळीच झालेले वादविवाद या सर्व गोष्टी या स्टॅसिसमध्ये प्रवेश केला की बाहेरच राहतात. आणि ऑफिसमध्ये जाईपर्यंत आपल्याला टाइम मिळतो. बाहेर नेहमीची स्टेशन्स आणि ठिकाणं जात असतात. कुठे झोपडपट्टी दिसते. त्यातली मुलंमाणसं जगण्यासाठी धडपड करताना दिसतात आणि त्यावर आधारित असंख्य गाणी आठवतात. नकळत प्लेलिस्ट केली जाते. बदलली जाते. मग कधी ती भक्तिगीते होतात तर कधी मेडले. कधी कधी मॉर्निंग मेडिटेशन म्हणून वाद्य संगीत लावलं जातं तर कधी खूप गर्दीतून जायचं म्हणून एनर्जेटिक म्युझिक लावून जगाच्या वेगाशी स्पर्धा केली जाते. एफएम चॅनल तर पहाटेपासून अतिशय छान छान कार्यक्रम देत असतात. सकाळीच लेटेस्ट गाणी आवर्जून ऐकवली जातात. सध्या तर ‘सुख कळले, वेड लावलंय पासून ते वाळवी आणि ओ शेठ’ पर्यंतची गाणी प्रवासात सर्रास ऐकली जातात. महानगरात राहणारी तरुण पिढी कानावर स्टड्स चढवायला एकवेळ विसरेल पण इअरबड्स नाही विसरणार! डोळय़ांसमोर उंच उंच इमारती, चकाचक कॉर्पोरेट ऑफिसेस, अनेकपदरी रस्त्यावर धावणारी वाहने आणि कानाशी असणारी अप्रतिम गाणी..आणखी काय हवं असतं?
आरजे ऊर्फ रेडिओ जॉकी यांचंही गाणी प्रसिद्ध करण्यात योगदान असतं. त्यांची बोलण्याची स्टाइलच इतकी भारी असते की आपोआप आपण ताजेतवाने होऊन जातो. याच आरजेला केंद्रवर्ती धरून निर्मित केलेला ‘तुम्हारी सुलू’ हा असाच एक माईलस्टोन चित्रपट आहे. विद्या बालनने अप्रतिम भूमिका वठवलेल्या या सिनेमातील ‘मनवा लाइक्स टु फ्लाय, बन मेरी रानी रानी’ ऑफिसगोअर्सचा हॉट चॉइस होती रादर अजूनही आहेत. ‘सैराट’ची गाणी हा असाच एक चमत्कार! खरं तर प्रचंड मेहनत, कल्पकता आणि योजनाबद्ध कामाचा आविष्कार म्हणजे सैराटची गाणी. हा पिक्चर रिलीज झाल्यापासून ते पुढची तीन सलग वर्षं सगळय़ा चॅनल्सवर ही गाणी अक्षरशः गाजत होती आणि वाजत होती. सकाळी सकाळी बसने पुणे कॉर्पोरेशन पूल क्रॉस करताना ‘रेड एफएम की शेंडी’ च्या धमाल प्रॅक्टिकल जोकला फॉलो करत सैराटचं एक गाणं अचूक लावलं जायचं. दिवस प्रेश होऊन जायचा. मझा यायची. रेडिओ मिर्ची, रेडिओ सिटी, रेड एफएम अशी असंख्य चॅनल्स आणि उत्साहाच्या कोसळत्या धबधब्यासारखं बोलणारे आरजेज् आणि ती गाणी.. बस्स…
मध्येच,
हवा के झोके आज मौसमों से रूठ गए
गुलों की शौखियाँ जो भँवरे आके लूट गए
बदल रही है आज जिंदगी की चाल जरा
इसी बहाने क्मयूँ न मैं भी दिल का हाल जरा
म्हणत ‘सँवार लूँ हाए सँवार लूँ’ करत सोनाक्षी आठवण करून जायची.
पावसाळी हवा असताना, धोधो पाऊस कोसळत असताना कामाला जाण्यासाठी बाहेर पडणाऱया माणसांचा मूड जमून येतो तो,
पानी दा रंग वेख के
आंखियाँ चो हंजो रोड़ दे
माहिया ना आया मेरा माहिया ना आया
रांझणा ना आया मेरा माहिया ना आया
माहिया ना आया मेरा रांझणा ना आया
आँखा दा नूर वेख के
आंखिया चो हंजो रोड़ दे
कमली हो गयी तेरे बिना आजा रांझण मेरे
बारीश बरखा सब कुछ बह गयी आया निज ना मेरे,
यांसारख्या मस्त गाण्याने! खरोखरच यातला खरं तर एकही शब्द गाळावासा वाटत नाही. तसंच ‘दिल दिया गल्ला’. पंजाबी स्टाइल गाणी आणि ठेका मूडमेकिंग असतात हे खरं. पण आपली मराठी गाणी काही मागे नाहीत हं! नुसतं सैराटच नव्हे तर
अधिर मन झाले मधुर घन आले
धुक्मयातुनी नभातले सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले
यासारखं अस्सल मराठी धुंद गीत पावसाळी सकाळ मस्त सुरेल करून टाकतं. महानगरातील रोजच्या धकाधकीच्या जीवनात मजा आणणारी, कंटाळवाणा रोजचा प्रवास ताजा करून सोडणारी शेकडो गाणी असतील. प्रत्येक माणसाची आवडनिवड निराळी असते. या सगळय़ात कारने जाणारी माणसं असतात, बसच्या टेनच्या गर्दीत चेंगरत जाणारी असतात. काही भाग्यवानांचं ऑफिस जवळच असलं तर ती चालत जाणारीही असतात. झपाझप चालताना त्यांची पावलं त्या गाण्यांच्या स्पीडने उचलत असतात. आसपासच्या परिसरात कामावर हजर होणारी प्रेश लोकं बघून त्यांना आणखी प्रसन्न वाटत असतं. आणि रेडिओ आणि यूटय़ूब त्यांचा दिवस सुरेल करीत असतात. यातच हौसेने शास्त्रीय संगीत ऐकणारीही असतात. धीरगंभीर तोडी, गूढमधुर भैरव, प्रभातकिरणांसारखा उजळत नेणारा भटियार, अरुणोदयाच्या रंगाचा बिभास त्यांची सकाळ उजेडात आणतात. संतूर बासरी आणि पखावजचं काँबो असणारं कॉल ऑफ द व्हॅली त्यांच्या साथीला असतं. कधी मल्लिकार्जुन मन्सूर असतात तर कधी पं. कुमार गंधर्व, पं.भीमसेन जोशी असतात. पण हा ऑफिसगोअर्सचा मूडटाइम असणारी ही गाणी असोत कोणतीही, पण अपडाउन गाणी म्हणूनच ओळखावीशी वाटतात. साथ देणारी, जग घडवणारी!
-ऍड. अपर्णा परांजपे-प्रभु








