जळगाव / प्रतिनिधी :
ट्रान्सजेंडरसाठी मीडियाने पारलिंगी हा शब्द वापरायला हवा. तृतीयपंथी हा शब्द पितृसत्ताकतेतून आलेला आहे. लिंग ओळख जाहीर करणाऱ्या व्यक्तीला स्वीकारणारा समाज आणि कुटुंब आपल्याला निर्माण करावयाचा असून, यामध्ये माध्यमांची जबाबदारी मोठी असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटील यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळा आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टीस एम्पॉवरमेंट, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ट्रान्सजेंडर ऍन्ड मीडिया’ या कार्यशाळेचे उद्घाटन शमिभा पाटील यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी बोलताना पाटील म्हणाल्या, पारलिंगी व्यक्तींच्या बाबतीत जैविक, सामाजिक आणि सांस्कृतिक संकल्पना समजून घेतल्या जाव्यात. आज स्वत:ची लिंग ओळख सांगणाऱ्यांची संख्या कमी आहे. अशी लिंग ओळख जाहीर करणाऱया व्यक्तीला समाजात आदराचे स्थान निर्माण होणे आवश्यक आहे. तसा समाज निर्माण करण्यात माध्यमे महत्वाची भूमिका निभावू शकतात. लैंगिकतेचा आणि हुशारी व कर्तृत्वाचा काही संबंध नाही. त्यामुळे माध्यमांनी ट्रान्सजेंडरसाठी पारलिंगी हा शब्द वापरायला हवा.
सामाजिक न्याय व विशेष व सहाय्य विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील म्हणाले, ट्रान्सजेंडरच्या तक्रारींचे जलद गतीने प्रभावी नियंत्रण व निवारण करण्यासाठी सरकारच्या काही योजना आहेत. जळगाव जिह्यात 140 ट्रान्सजेंडर असले तरी शासकीय पोर्टलवर 94 ट्रान्सजेंडर व्यक्तींनी नोंदणी केली आहे. त्यामुळे इतरांनी नोंदणी केली तर निश्चितपणे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल.








